

आज गुरू पौर्णिमा (Guru Purnima 2024) आहे. त्यानिमित्त स्वामी विवेकानंद आणि त्यांचे गुरू रामकृष्ण परमहंस यांच्यातील देवाच्या अस्तित्वाबद्दलचा हा संवाद. नरेंद्र दत्त यांचा स्वामी विवेकानंद हाेण्याचा प्रवास येथूनच सुरू झाला.
रामकृष्ण हसले आणि काही न बोलता नरेंद्रकडे पाहात राहिले. "केशवचंद्र सेन, देवेंद्रनाथ टागोर यांनी सुचवलं म्हणून मी इथे आलो आहे," नरेंद्र म्हणाले.
"माझी परीक्षा घ्यायला," रामकृष्णांनी नरेंद्र यांच्या मनातील भाव ओळखले होते. नरेंद्रला हे पाहून क्षणभर विस्मय वाटला.
"स्पष्टच सांगायचे ठाकूरजी, मला कुठल्याही साधू, संत, बैरागी यांच्याबद्दल मनात दाटून येत नाही; परंतु मी एक अभ्यासक आहे, विद्यार्थी आहे. माझ्या मनाला समाधानकारक उत्तर मिळत नाहीत, तोवर मी अस्वस्थ असतो आणि त्या प्रश्नांची उत्तरं विचारत मी फिरतो," नरेंद्र म्हणाले.
"म्हणजेच तू माझी परीक्षाच घ्यायला आलास ना?" रामकृष्ण परमहंस म्हणाले.
"तसं समजा हवं तर!" सुरेंद्रला वाटत होते, इतक स्पष्ट नरेंद्रने विचारायला नको होते. त्यांनी नरेंदना रोखण्याचा प्रयत्न केला. पण नरेंद्र स्वतःच्याच नादात होते.
"सत्य असणारे ज्ञान आणि विज्ञान मी जाणतो. हा अहंभाव नाही. वास्तव आहे. आज जो प्रश्न पडला आहे, तो ज्ञान-विज्ञानाच्या पलीकडचा आहे," नरेंद्र म्हणाले. यावर रामकृष्ण परमहंस खळखळू हसले, नरेंद्रच्या पाठीवर हात ठेवत म्हणाले "विचार, नरेंद्र विचार."
"ठाकूरजी तुम्ही देवाला प्रत्यक्ष पाहिलंय?" नरेंद्रचा प्रश्न ऐकून सुरेंद्र चमकला.
क्षणाचाही विलंब न करता परमहंस म्हणाले, "हो नरेंद्र, मी देवाला पाहिले आहे. तो तुझ्यात आहे, माझ्यात आहे, जे जे सजीव, त्यात ईश्वर आहे. या सृष्टीत ईश्वराचे अनेक रूपं आहेत. तू बघ ना, तुला देव दिसेल. तो प्रत्यक्ष आहे, अप्रत्यक्ष आहे. सजीवात त्याचा अंश आहे, निर्जीवात त्याचं कार्य आहे."
"म्हणजे?" नरेंद्र विस्मयचकित झाला.
"तुझ्यात, माझ्यात असलेले देवाचं अस्तित्व सर्वत्र आहे." रामकृष्ण सांगत होते.
"निर्जीवात त्याचं कार्य कसं?" नरेंद्रने पुढचा प्रश्न विचारला.
"हे उंच पर्वत, या खळखळत वाहणाऱ्या नद्या, ही भूमी यात सजीवता नसली तरी त्यात ईश्वरीय कार्य आहे. म्हणूनच हे नभोमंडल, चंद्र, सूर्य, तारे अखंड कार्यरत आहेत. नरेंद्र, ईश्वराची प्रतिमा ठायीठायी आहे. त्याचं कार्य विशाल आहे. तू माझ्या दृष्टीने पाहा, तुला होईल देवाचं दर्शन!"
नरेंद्र स्तब्ध झाला. आजवर एकानेही देवाला पाहिलं असल्याचं म्हटलं नव्हतं. नरेंद्र विचारमग्न झाला. रामकृष्ण म्हणाले, "सत्य, असत्याचा विचार करू नको आणि संभ्रमितही होऊ नकोस. काही काळाने निश्चित माझ्या विधानाचा अर्थ कळेल. आज नाही कळणार."
"नरेंद्र, हा विश्वाचा पसारा त्यानेच निर्माण केला आहे. ठायी, ठायी त्यांची पदचिन्हं आहेत. ठायी, ठायी त्याचं अस्तित्व आहे. तो तुझ्यात आहे, माझ्यात आहे. तसाच तो सर्वत्र आहे," रामकृष्ण म्हणाले.