

Gopal Sadhu viral video
एक गुजराती लोकगायक सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला आहे. जुनागढमध्ये आयोजित 'डायरो' कार्यक्रमादरम्यान भजन गायक गोपाळ साधू यांच्यावर नोटांचा पाऊस पाडण्यात आला. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
जुनागढमधील खंभाळिया गावात 'डायरो' (संगीत, कथाकथन आणि विनोदाचा मिलाफ असलेला पारंपरिक गुजराती लोककला प्रकार) आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमादरम्यान भाविकांनी भजन गायक गोपाळ साधू यांच्यावर नोटांचा प्रचंड वर्षाव केला, ज्यामुळे ते पूर्णपणे नोटांनी वेढले गेले. तरीही त्यांनी आपले गायन थांबवले नाही.
सध्या व्हायरल होत असलेल्या या क्लिपमध्ये, गोपाळ साधू हे आजूबाजूच्या परिस्थितीचा कोणताही विचार न करता अत्यंत शांतपणे पेटी (हार्मोनियम) वाजवताना दिसत आहेत, तर दुसरीकडे भाविक त्यांच्यावर नोटांनी भरलेली पोती रिकामी करत आहेत. एका क्षणी तर नोटांचा ढीग इतका मोठा झाला की गायक त्यात जवळपास दिसेनासे झाले होते. स्टेजवर त्यांच्या अवतीभवती नोटांचा ढीग साचला असतानाही, त्यांनी कोणताही व्यत्यय येऊ न देता आपला परफॉर्मन्स सुरूच ठेवला.
या कार्यक्रमाचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर शेअर केले जात असून, यावर नेटीझन्सकडून आश्चर्य आणि चर्चा दोन्ही व्यक्त केल्या जात आहेत. एका यूजरने म्हटलं आहे की, "याला म्हणतात खरा 'वर्क फ्रॉम होम'. फक्त शांतपणे बसायचं आणि नोटांच्या पावसात भिजायचं. असा अनेक संमिश्र प्रतिक्रिया या व्हिडिओवर येत आहेत.
२०२३: वलसाडमध्ये 'वलसाड अग्निवीर गो सेवा दला'ने आयोजित केलेल्या विशेष भजन कार्यक्रमात गायक कीर्तीदान गढवी यांच्यावर १०, २०, ५० आणि १०० रुपयांच्या नोटांचा प्रचंड वर्षाव करण्यात आला होता.डिसेंबर २०२२: गुजरातच्या नवसारी गावात एका भजन कार्यक्रमात कीर्तीदान गढवी यांच्यावर चक्क ५० लाख रुपयांच्या नोटा उडवण्यात आल्या होत्या. याशिवाय २०१७ आणि २०१८ मध्येही असेच व्हिडिओ समोर आले होते.
गुजरातमध्ये मेहफिल किंवा संगीताच्या कार्यक्रमांदरम्यान पैसे उडवण्याची ही प्रथा नवीन नाही. विशेषतः तिथल्या लोकगायकांच्या कार्यक्रमात अशा प्रकारे नोटांचा वर्षाव केला जातो. परंपरेनुसार, कार्यक्रमाला उपस्थित असलेले लोक गायकावर पैशांचा वर्षाव करतात आणि गोळा झालेली ही सर्व रक्कम सामाजिक कार्यासाठी किंवा समाजकल्याणासाठी वापरली जाते.