

GST collection 12.6 percent increase
नवी दिल्ली : एप्रिलमध्ये भारतातील जीएसटी संकलनाने एक नवा विक्रम प्रस्थापित केला. सरकारी आकडेवारीनुसार जीएसटी संकलन १२.६ टक्क्याने वाढले असून २.३७ लाख कोटी रुपये संकलित झाले. मार्चमध्ये हे संकलन ९.९ टक्क्याने वाढून १.९६ लाख कोटी रुपये संकलित झाले होते.
एप्रिल २०२४ मध्ये जीएसटी संकलन २.१० लाख कोटी रुपये होते. १ जुलै २०१७ रोजी जीएसटी लागू झाल्यानंतर हा दुसरा सर्वाधिक कर संग्रह होता. मार्च २०२५ मध्ये हा संग्रह १.९६ लाख कोटी रुपये होता. देशातील व्यवहारांमधून मिळणारा जीएसटी महसूल १०.७% ने वाढून सुमारे १.९ लाख कोटी रुपयांवर पोहोचला. त्याच वेळी आयात केलेल्या वस्तूंपासून मिळणारा महसूल २०.८ % वाढून ४६,९१३ कोटी रुपये झाला. एप्रिलमध्ये परतावा जारी करण्याचे प्रमाण ४८.३ % वाढून २७,३४१ कोटी रुपये झाले. डिसेंबरमध्ये जीएसटी संकलन १.७७ लाख कोटी रुपये होते. गेल्या वर्षीपेक्षा हे ७.३ % जास्त होते. नोव्हेंबरमध्ये ही वाढ ८.५ % होती.
अर्थसंकल्पात सरकारने जीएसटी महसुलात ११ % वाढ होण्याचा अंदाज वर्तवला आहे. केंद्रीय जीएसटी आणि भरपाई उपकरासह एकूण संकलन ११.७८ लाख कोटी रुपये होईल असा सरकारचा अंदाज आहे.