Bike Price After New GST: स्प्लेंडर, टीव्हीएस अपाचे स्वस्त होणार, जीएसटी बदलानंतर सुधारित किंमत किती?

नव्या जीएसटी रचनेमुळे ३५० सीसीखालील बाईक्स २० हजार रुपयांपर्यंत स्वस्त होणार आहेत. रॉयल एनफिल्ड, ट्रायम्फ, बजाज, हार्ले-डेव्हिडसनसारख्या मोठ्या बाईक्सवर काय परिणाम होणार वाचा सविस्तर...
GST impact on motorcycles
GST Impact on Motorcyclesfile photo
Published on
Updated on

GST Impact on Motorcycles

नवी दिल्ली : २२ सप्टेंबरपासून लागू होणाऱ्या नव्या जीएसटी प्रणालीमुळे दुचाकी वाहनांच्या बाजारात मोठी उलधापालध होत असल्याची पाहायला मिळत आहे. या बदलामुळे ३५० सीसीच्या खालील दुचाकी २०,००० रुपयांपर्यंत स्वस्त होणार आहेत. मात्र जीएसटी वाढल्याने रॉयल एनफील्ड हिमालयन आणि गुरिल्ला सारख्या ४००-४५० सीसीच्या बाईक्स २५,००० रुपयांपर्यंत तर ६५० सीसी बाईक्सच्या किमती ४०,००० रूपयांपर्यंत वाढणार आहेत.

३५० सीसीच्या खालील बाइक्स स्वस्त

बाजारातील ९५% हून अधिक हिस्सा असलेल्या ३५० सीसी (cc) पेक्षा कमी क्षमतेच्या छोट्या कार आणि दुचाकींसाठी ही आनंदाची बातमी आहे. १,२०० सीसीपर्यंतचे पेट्रोल, एलपीजी, सीएनजी, आणि हायब्रिड कार तसेच १,५०० सीसीपर्यंतच्या डिझेल कार आणि ४,००० मिमीपेक्षा कमी लांबीच्या वाहनांवर आता १८% जीएसटी लागेल. याआधी हा कर ३१% पर्यंत (सेससह) होता. एसयूव्ही (SUV) आणि लक्झरी कारसाठी तो कमी होऊन ४०% झाला आहे, तर इलेक्ट्रिक वाहनांसाठी ५% कायम ठेवण्यात आला आहे. ३५० सीसीपेक्षा कमी क्षमतेच्या मोटरसायकलना देखील लाभ होणार असून, त्यांच्यावरील जीएसटी २८% वरून १८% पर्यंत खाली आला आहे. यामुळे, नवीन बाइक खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी त्या अधिक परवडणाऱ्या ठरतील. हिरो स्प्लेंडर, होंडा शाइन, टीव्हीएस अपाचे सारख्या गाड्या परवडणाऱ्या किमतीत मिळतील. होंडा अ‍ॅक्टिव्हा, टीव्हीएस स्कूटी सारख्या स्कूटर्सच्या किमती सुमारे ८,००० रूपयांपर्यंत कमी होतील. सुमारे १ लाखाच्या बाईकची किंमत आता ९०,००० रुपये असेल.

बुलेटप्रेमींसाठी झटका!

याउलट, ३५० सीसी आणि त्याहून अधिक क्षमतेच्या मोठ्या बाइक्सवर २८% वरून ४०% पर्यंत जीएसटीचा मोठा वाढलेला भार पडला आहे. यामुळे, रॉयल एनफील्ड, केटीएम, हिरो मोटोकॉर्प, बजाज, ट्रायम्फ आणि हार्ले-डेव्हिडसन सारख्या लोकप्रिय मॉडेल्सची किंमत लक्षणीयरीत्या वाढणार आहे. अंदाजानुसार, हिमालयन आणि गुरिला सारख्या बाइक्सच्या किमतीत सुमारे २५,००० रुपयांनी, तर इंटरसेप्टर आणि बीएसए गोल्ड स्टार सारख्या उच्च-श्रेणी मॉडेल्समध्ये ४०,००० रुपयांपर्यंत वाढ होऊ शकते. या वाढलेल्या कराच्या कक्षेत रॉयल एनफील्डच्या नऊ मॉडेल्सचा समावेश आहे. क्लासिक ६५०, स्क्रॅम ४४०, बेअर, गुरिला, शॉटगन, हिमालयन, सुपर मिटिऑर, इंटरसेप्टर, आणि कॉन्टिनेंटल जीटी. तसेच, केटीएमची ३९० सिरीज, बजाजची पल्सर एनएस ४०० झेड, ट्रायम्फची स्पीड ४००, आणि हार्ले-डेव्हिडसनची एक्स ४४० देखील या कर कपातीत येतात. मात्र, रॉयल एनफील्डची क्लासिक ३५०, हंटर, बुलेट, मिटिऑर आणि होंडाची एच'नेस सीबी३५० आणि सीबी ३५० आरएस यांसारखी मॉडेल्स ३५० सीसीच्या खाली असल्याने त्यांना ४०% जीएसटी लागू होणार नाही.

नव्या जीएसटीचा दुचाकी बाजारावर काय परिणाम होईल?

तज्ज्ञांच्या मते, ही करप्रणाली विरोधाभासी आहे. रॉयल एनफिल्डचे सिद्धार्थ लाल यांनी याआधी सर्व बाईक्सवर एकसमान १८% जीएसटी लागू करण्याची मागणी केली होती. त्यांचे म्हणणे आहे की या विभाजित करप्रणालीमुळे भारताचा मोठ्या बाईक्सच्या जागतिक बाजारातील दर्जा कमी होऊ शकतो. क्लासिक लेजेंड्सचे अनुपम थरेजा यांनी छोट्या बाईक्सवरील जीएसटी कपातीचे स्वागत केले. परंतु त्यांच्या ६५२ सीसीच्या बीएसए गोल्ड स्टार बाईकवर कराचा मोठा भार पडणार असल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले, “१९९५ च्या नियमनामुळे यझदी व जावा संपुष्टात आले होते, परंतु २०२५ च्या या नियमामुळे ते पुन्हा उजळून निघतील. आमच्या ३०० व ३४९ सीसी इंजिन प्लॅटफॉर्मना आता थेट फायदा होणार आहे.”

मोठ्या बाईक्सचा बाजार छोट्या बाईक्सच्या तुलनेत जलद वाढतो आहे. शहरी व्यावसायिक आणि तरुण ग्राहक एन्ट्री-लेव्हल बाईक्समधून अपग्रेड होत असल्याने मागणी वाढली आहे. गेल्या वर्षी रॉयल एनफिल्डने ३५० सीसीवरील जवळपास १.५ लाख बाईक्स विकल्या. बजाजनेही तेवढ्याच विकल्या, तर ट्रायम्फने दोन वर्षांत जवळपास ७० हजार बाईक्स विकल्या. तज्ज्ञांच्या मते, नव्या करप्रणालीमुळे हा वेग मंदावू शकतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news