ग्रेटर नोएडा : लग्नानंतर आठ वर्ष हुंड्यासाठी छळ करून अखेर एका २६ वर्षीय विवाहितेची तिच्या पतीने आणि सासरच्यांनी मिळून निर्घृणपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना ग्रेटर नोएडातील सिरसा गावात घडली आहे. पीडितेला जिवंत जाळण्यात आले. गंभीररित्या भाजलेल्या अवस्थेत काही तास मृत्यूशी झुंज दिल्यानंतर अखेर तिचा दुर्दैवी मृत्यू झाला.
याप्रकरणी पोलिसांनी तिचा पती विपिन भाटी याला अटक केली आहे, तर सासू, सासरे आणि दीर अद्याप फरार आहेत. अतिरिक्त पोलीस उपायुक्त (DCP) सुधीर कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, निक्की भाटी असे मृत महिलेचे नाव आहे. २१ ऑगस्टला तिला गंभीर भाजलेल्या अवस्थेत फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. प्रकृती चिंताजनक असल्याने तिला दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात हलवण्यात येत असताना वाटेतच तिचा मृत्यू झाला. निक्कीची बहीण कांचन हिने दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
२०१६ मध्ये निक्की आणि तिची बहीण कांचन या दोघींचे लग्न दोन भावांशी झाले होते. कांचनचे लग्न रोहितशी, तर निक्कीचे लग्न विपिनशी झाले होते. कांचनने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, लग्नाच्या वेळी तिच्या कुटुंबीयांनी एक स्कॉर्पिओ गाडी आणि इतर मौल्यवान वस्तू दिल्या होत्या. तरीही सासरचे लोक ३६ लाख रुपयांची मागणी करत होते. नंतर आणखी एक गाडी देण्यात आली, पण पैशांची मागणी आणि छळ थांबला नाही. कांचनने सांगितले, "ते निक्कीला रोज मारहाण करून तिचा छळ करत होते. मी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी मलाही मारहाण करायचे.
कांचनने पुढे सांगितले की, निक्कीचा पती विपिन हा बेरोजगार होता आणि त्याला दारूचे व्यसन होते. तो अनेकदा निक्कीला मारहाण करायचा आणि त्याचे आई-वडील त्याचीच बाजू घ्यायचे. त्यांच्यातील वाद अनेकदा स्थानिक पंचायतीसमोर मांडण्यात आले होते, परंतु छळ थांबला नाही. २१ ऑगस्ट रोजी विपिनने दोन्ही बहिणींना मारहाण केली. त्यानंतर त्याने निक्कीच्या मानेवर जोरदार प्रहार केला, ज्यामुळे ती खाली कोसळली. "यानंतर त्याने तिच्या अंगावर ज्वलनशील पदार्थ ओतून तिला पेटवून दिले," असा गंभीर आरोप कांचनने केला आहे. छळाचे काही व्हिडिओही पोलिसांच्या हाती लागले असून, त्यात पती आणि सासू निक्कीला मारहाण करत आणि फरफटत नेत असल्याचे दिसत आहे.
घटनेनंतर शेजारी आणि बहिणीने निक्कीला तातडीने रुग्णालयात दाखल केले, परंतु गंभीररित्या भाजल्यामुळे तिचा जीव वाचू शकला नाही. रुग्णालयाकडून माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. पोलिसांनी खुनातील मुख्य आरोपी पती विपिन, त्याचा भाऊ रोहित आणि त्यांचे आई-वडील दया आणि सतवीर यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला असून विपिन याला अटक केली आहे.
अटकेनंतरही विपिनने पश्चात्ताप व्यक्त केलेला नाही. त्याने निर्लज्जपणे म्हटले की, “मला काही खेद नाही. मी तिला मारलेले नाही. ती स्वतःच मेली. नवरा-बायकोचे भांडण तर नेहमीच असते.” निक्कीच्या वडिलांनी पोलिसांच्या कारवाईचे समर्थन केले. त्यांनी म्हटले की, “पोलिसांनी योग्य केले. गुन्हेगार नेहमी पळून जातत आणि विपिन हा गुन्हेगारच आहे. आमची मागणी आहे की उरलेले आरोपी देखील पकडले जावेत.”
दरम्यान, शनिवारी खुनातील मुख्य आरोपी पती विपिन भाटी पोलिस कोठडीतून पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना चकमकीत गोळी घालून जखमी झाला. विपिनला त्याने खरेदी केलेली थिनरची बाटली दाखविण्यासाठी नेले जात होते. त्या वेळी त्याने पोलिसांकडून पिस्तूल हिसकावण्याचा प्रयत्न केला आणि चेतावणी देऊनही सिरसा चौकाजवळून पळून जात होता. त्यानंतर पोलिसांनी गोळीबार केला. त्यातील एक गोळी त्याच्या पायाला लागली.