

Social Media Posts Blocked Government Order RTI: भारतात गेल्या काही दिवसात सोशल मीडिया पोस्ट, अकाऊंट ब्लॉक करण्याचा धडाका सुरू झाला आहे. विद्यार्थी आंदोलनानंतर याला तुफान वेग आल्याचे दिसत आहे. सरकारकडून सरासरी ६८ सेकंदात एक ब्लॉकची ऑर्डर येत आहे. एका दिवसात जवळपास १२७५ तर पाच महिन्यात तब्बल १.९५ लाख पोस्ट ब्लॉक करण्याचे आदेश आले आहेत अशी माहिती RTI मार्फत मिळाली आहे.
हे कंटेट ब्लॉक निर्देश इन्स्टाग्राम, फेसबूक आणि युट्यूबवरील कंटेटबाबत आले आहेत. या वर्षी मार्च पासून जुलै महिन्यापर्यंतचा ही आकडेवारी असून ही माहिती द इंडियन एक्सप्रेसने दिली आहे.
विशेष म्हणजे याच काळात दिल्लीतील जंतर मंतरवर विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू झाले होते. हे आंदोलन जून महिन्यात सुरू झाले आणि २५ जुलै रोजी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर संपुष्टात आले.
आरटीआय रेकॉर्डमध्ये द इंडियन एक्सप्रेसला गेल्या वर्षाचा ऑक्टोबर २०२४ ते ऑक्टोबर २०२५ पर्यंतचा डेटा देखील मिळाला आहे. त्यात जवळपास २३१२ ब्लॉकिंग ऑर्डर्स पाठवण्यात आल्या होत्या. या ऑर्डर्स १९ ऑनलाईन प्लॅटफॉर्म्सला सहयोग पोर्टलद्वारे पाठवण्यात आले. दिवसाला सरासरी ६ ब्लॉकिंग ऑर्डर गेल्या आहेत. महिन्याला सरासरी किती ब्लॉकिंगच्या ऑर्डर गेल्या याबाबत माहिती मिळालेली नाही.
वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याने सांगितलं की या ब्लॉकिंग ऑर्डर या विद्यार्थी आंदोलन इन्स्टाग्रामवर जास्त वाढू लागल्यानंतर देण्यात आल्या होत्या. तीन प्रमुख प्लॅटफॉर्ममधील सर्वात जास्त मोठा शेअर हा इन्स्टाग्राम अकाऊंट्सबाबतचा होता. पाच महिन्यात जवळपास १ लाख म्हणजे निम्म्या ब्लॉकिंग ऑर्डर्स या इन्स्टाग्राम प्लॅटफॉर्मसाठी होत्या. फेसबूकसाठी जवळपास ८० हजार तर युट्यूबसाठी जवळपास १५ हजार ब्लॉकिंग ऑर्डर्स देण्यात आल्या.