

ANI Copyright Dispute:
नवी दिल्ली : एशियन न्यूज इंटरनॅशनल (ANI) वृत्तसंस्था आणि यूट्यूब निर्मात्यांमध्ये (कंटेंट क्रिएटर्स) झालेल्या कॉपीराईट वादानंतर आता देशातील सरकारी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सने त्यांच्याकडील विस्तृत संग्रहातील सामुग्री मोफत किंवा अत्यंत अल्पदरात उपलब्ध करणार असल्याची घोषणा केली आहे. प्रसार भारती, ऑल इंडिया रेडिओ, दूरदर्शन नॅशनल आणि प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो (पीआयबी) यांनी त्यांची यूट्यूबसह सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सार्वजनि वापरासाठी उपलब्ध करून दिली आहेत. देशभरातील 'कंटेंट क्रिएटर्सना' अधिकृत माहिती उपलब्ध होण्याचा मार्ग सुकर होणार आहे.
५० श्रेणी आणि १५ भाषांमधील कंटेंट मोफत मिळणार : आकाशवाणी
आकाशवाणीने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वरील अलीकडील पोस्टमध्ये घोषणा केली आहे की, क्रिएटर्सना ५० श्रेणी आणि १५ भाषांमधील कंटेंट शॉर्ट्स आणि माहितीपट मोफत मिळू शकतात. प्रसार भारतीने "दुर्मिळ फोटो, ऐतिहासिक क्लिप्स आणि विश्वासार्ह डेटा" उपलब्धतेवर भर देत म्हटले आहे की, कंटेंट निर्मात्यांसाठी मोफत आणि कॉपीराइट-मुक्त आहे. पीआयबीने देखील अशाच आशयाची एक्स पोस्ट शेअर केली आहे.
'प्रसार भारती पूर्णपणे कॉपीराइट-मुक्त आणि वापरासाठी अधिकृत'
प्रसार भारती म्हटले आहे की, पूर्णपणे कॉपीराइट-मुक्त आणि वापरासाठी अधिकृत, 24/7 मोफत सहज उपलब्ध असलेल्या बातम्या क्लिप्स, ऑडिओ मटेरियल, लिखित कथा आणि व्हिज्युअल्ससाठीचे एक व्यासपीठ. या निर्णयामुळे आता देशभरातील 'कंटेंट क्रिएटर्सना' अधिकृत माहिती उपलब्ध होण्याचा मार्ग सुकर होणार आहे.
'एएनआय' आणि 'यूट्यूबर्स'मधील नेमका वाद काय?
एएनआय आणि अनेक यूट्यूबर्समधील वाद सुरु आहे. कोलकाता मेडिकल विद्यार्थींनी बलात्कार व हत्या प्रकरण आणि 'ऑपरेशन सिंदूर' वरील व्हिडिओंमध्ये एएनआय काही फुटेज वापरले होते. कंटेंट क्रिएटर्स मोहक मंगल यांनी अलीकडेच एएनआयवर यूट्यूबच्या कॉपीराइटचा गैरवापर केल्याचा आरोप केला. मोहक मंगल यांनी दावा केला की त्यांच्या चॅनेलला कॉपीराइट स्ट्राइक मिळाले आहेत आणि आरोप केला आहे की एएनआयने परवाना शुल्क किंवा दंड मागितला आहे.
मोहक मंगल यांच्यासह रजत पवार यांच्यासह अन्य कंटेंट क्रिएटर्संनीही अशा प्रकारची तक्रार केली होती. . पवार यांनी आरोप केला की, एएनआयने त्यांच्या कंटेंटवर स्ट्राइक जारी केले. परवाना करार किंवा वार्षिक १८ लाख रुपयांचा दंड भरण्याच्या बदल्यात ते काढून टाकण्याची ऑफरही दिली, अन्यथा चॅनेल बंद करण्याचा इशारा दिला होता. सध्या हे प्रकरण दिल्ली उच्च न्यायालयात असून, 'एएनआय'ने मंगल यांच्याविरुद्ध मानहानीचा खटला दाखल केला आहे. न्यायालयाने मंगल यांना बदनामीकारक व्हिडिओंचे काही भाग काढून टाकण्याचे निर्देश दिले आहेत.