UP Crime News
उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशातील गोरखपूर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली. मित्राला जाड म्हणून चिडवणे त्याच्या दोन मित्रांना जीवघेणं ठरलं आहे. एका जेवणाच्या कार्यक्रमात 'मोटू' म्हणत चेष्टा केल्याने रागाच्या भरात एका तरूणाने त्याच्याच दोन मित्रांवर गोळीबार केला. याप्रकरणी खजनी पोलिसांनी दोन तरूणांना अटक केली आहे.
गोरखपूर येथील अर्जुन चौहान त्याच्या काकांसोबत बेलघाट परिसरातील तारकुल्हा देवी मंदिराजवळ एका कार्यक्रमाला गेला होता. या कार्यक्रमादरम्यान, मंझारिया येथील अर्जुन याचे मित्र अनिल चौहान आणि शुभम चौहान यांनी त्याच्या वजनाची सर्वांसमोर खिल्ली उडवली आणि त्याला 'मोटू' म्हणत चिडवले. रागावलेल्या अर्जुनने याचा बदला घेण्याचे ठरवले.
आपली चेष्टा केल्यामुळे अर्जुनला राग आला आणि त्याने दोघांनाही धडा शिकवण्याचा निर्णय घेतला. अर्जुनने त्याचा दुसरा मित्र आसिफसोबत मिळून कट रचला आणि अनिल-शुभमचा पाठलाग सुरू केला. महामार्गावर सुमारे २० किलोमीटरपर्यंत त्यांच्या कारचा त्यांनी पाठलाग केला. जगदीशपूर कालेश्वरजवळील तेनुआ टोल प्लाझाजवळ अर्जुनने त्यांची कार थांबवली. त्याने दोघांनाही बाहेर काढले आणि त्यांच्यावर गोळीबार करून पळून गेला.
दरम्यान, घटनेनंतर तेथे उपस्थित असलेल्या लोकांनी जखमींना तत्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल केले. तेथून त्यांना वैद्यकीय महाविद्यालयात हलवण्यात आले. दोघांचीही प्रकृती आता धोक्याबाहेर असल्याचे सांगण्यात येत आहे. गेल्या आठवड्यात ही घटना घडली आहे. पोलिस अधीक्षक (दक्षिण) जितेंद्र कुमार यांनी सांगितले की, मुख्य संशयित आरोपी अर्जुन चौहान आणि त्याचा साथीदार आसिफ यांना अटक करण्यात आली आहे.
अर्जुन याने पोलिसांना सांगितले की, "जेवणाच्या वेळी त्यांनी माझ्या वजनाची खिल्ली उडवली, ज्यावर मी नाराजी व्यक्त केली. घटनास्थळी उपस्थित असलेले इतर लोकही हसायला लागले. लोकांनी परिस्थिती शांत केली, पण मी अपमान केल्याने दोघांनाही संपवण्याचा निर्णय घेतला."