

पणजी : पावसाच्या यंदाच्या हंगामातील जुलै महिन्यातील पावसाने १२४ वर्षाचे रेकॉर्ड मोडले असून यंदा जुलै महिन्यात २१२४.४ मिलिमीटर पाऊस पडला आहे. यापूर्वी २०२३ मध्ये १७७७ मिलिमीटर, १९५३ मध्ये १७४८ मि.मी. तर १९३१ मध्ये १७४२ मिलिमीटर पावसाची नोंद झाल्याची माहिती राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेचे मान्सून संशोधक डॉ. एम रमेशकुमार यांनी दिली आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासात केपे येथे सर्वाधिक २०० मि.मी. पावसाची नोंद झाली असून सांगे येथे १६६ मिलिमीटर, वाळपई येथे १७४.६ मिलिमीटर, फोंडा येथे १४० मिलिमीटर, मुरगाव येथे १३८ मिलीमीटर तर मडगाव येथे १३६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. गेल्या २४ तासात सरासरी १३६.८ मिलिमीटर पाऊस बरसला. गोव्यात आत्तापर्यंत १९९२.७ मिलिमीटर पाऊस अपेक्षित असताना ३०९१.६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून ५५.१ मिलिमीटर अधिक पडला आहे. पावसाचे अद्यापही दोन महिने बाकी असताना वाळपई येथे ३८४८.६ मि.मी., सांगे येथे ३६५३.५ मिलिमीटर तर साखळी येथे ३४५१.६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. हा पाऊस हंगामातील चार महिन्याच्या सरासरीपेक्षा जास्त आहे.