

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला सेंट पीटर्सबर्ग येथे होणाऱ्या १० व्या ब्रिक्स संसदीय मंचासाठी भारतीय संसदीय शिष्टमंडळाचे नेतृत्व करत आहेत. त्यांनी शुक्रवारी (दि.12) बहुपक्षीय व्यापार प्रणालीचे विभाजन होण्यापासून रोखण्याचे आवाहन केले. तसेच जागतिक संकटाच्या परिणामांचे व्यवस्थापन संबंधित आव्हानांना सामोरे जाण्यासाठी संसदेची भूमिका या विषयावरील सत्राला संबोधित केले.
याप्रसंगी बोलताना लोकसभा अध्यक्ष म्हणाले की, शाश्वत विकासामध्ये पर्यावरण संरक्षणाचा समावेश असला तरी विविध देशांच्या आर्थिक विकासाचे स्तर लक्षात घेऊन हे उद्दिष्ट न्याय्य पद्धतीने साध्य करणे महत्त्वाचे आहे. पर्यावरणीय कृतींमुळे व्यापारावर परिणाम होत आहे, हवामानातील बदल रोखण्यासाठी पुरेशी संसाधने आवश्यक आहेत. विकसनशील देशांना त्यांच्या विकासासाठी याची गरज आहे.
लोकसभा अध्यक्ष बिर्ला म्हणाले की, आर्थिक सार्वभौमत्वाचे संरक्षण करण्यासाठी आणि आंतरराष्ट्रीय शिफारशींच्या अंमलबजावणीला पाठिंबा देण्यासाठी कायदे बनवण्यात संसद महत्त्वाची भूमिका बजावते. या संदर्भात भारताबद्दल बोलताना ते म्हणाले की, भारतीय संसद जागतिक व्यापार संघटनेच्या अंतर्गत बहुपक्षीय व्यापार प्रणालीचे समर्थन करते. भारताची संसद इतर देशांच्या संसद सदस्यांशी सखोल संवाद साधण्यासाठी वचनबद्ध असल्याचा पुनरुच्चारही त्यांनी केला.