पुढारी ऑनलाईन डेस्क : जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी आज (दि.३०) ३० वे लष्करप्रमुख म्हणून पदभार स्वीकारला. सध्याचे लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे आज सेवानिवृत्त झाले आहेत. चीन आणि पाकिस्तानच्या सीमेवर व्यापक ऑपरेशनल अनुभव असलेले जनरल द्विवेदी यांनी यापूर्वी लष्कराचे उपप्रमुख म्हणून काम केले आहे.
लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांचा जन्म १ जुलै १९६४ रोजी झाला. १५ डिसेंबर १९८४ रोजी भारतीय लष्कराच्या जम्मू-काश्मीर रायफल्समध्ये त्यांची नियुक्ती झाली. त्यांना सुमारे ४० वर्षांचा अनुभव आहे. आपल्या प्रदीर्घ सेवेदरम्यान त्यांनी विविध पदांवर काम केले आहे. त्यांनी जम्मू आणि काश्मीरमध्ये अनेक दहशतवादविरोधी मोहिमा राबविल्या आहेत. सीमाप्रश्न सोडवण्यासाठी चीनसोबत सुरू असलेल्या चर्चेत त्यांचा सक्रिय सहभाग होता. द्विवेदी यांच्या कमांड नियुक्तींमध्ये रेजिमेंट १८ जम्मू आणि काश्मीर रायफल्स, ब्रिगेड २६ सेक्टर आसाम रायफल्स, आयजी, आसाम रायफल्स (पूर्व) आणि ९ कॉर्प्सच्या कमांडचा समावेश आहे.