नवी दिल्ली, वृत्तसंस्था : निवडणुकीची भैरवी होऊ घातलेली असताना अर्थव्यवस्थेच्या आघाडीवर भारतासाठी एक अत्यंत गोड बातमी आलेली आहे. आर्थिक वर्ष 2023-24 च्या चौथ्या तिमाहीत म्हणजेच जानेवारी-मार्च 2024 चा जीडीपी वृद्धी दर 7.8 टक्के राहिला. शिवाय संपूर्ण आर्थिक वर्ष 2023-24 मधील जीडीपी वृद्धी दर 8.2 टक्के राहिला आहे.
आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये चीनचा जीडीपी वृद्धी दर 4.5 टक्क्यांच्या जवळपास राहिला. आर्थिक वर्षातील जानेवारी-मार्च तिमाहीतील चीनचा वृद्धी दर 5.3 टक्के राहिलेला आहे. त्या तुलनेत भारताचा वृद्धी दर जवळपास दुप्पट ठरलेला आहे.
गत आर्थिक वर्षातील याच तिमाहीत जीडीपी वृद्धी दर 6.1 टक्के होता. अनेक आंतरराष्ट्रीय संस्थांनी वर्तविलेल्या अंदाजापेक्षा भारताचा वृद्धी दर अधिक राहिलेला आहे. एवढेच काय तर भारताच्याच रिझर्व्ह बँकेने चौथ्या तिमाहीत 6.9 टक्के वृद्धी दराचा अंदाज वर्तविला होता. वस्तुत: तो एक टक्क्याने अधिक राहिला आहे.
राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने शुक्रवारी जीडीपीसंदर्भातील डेटा जाहीर केला आणि देशाच्या आर्थिक वर्तुळात आनंदाला भरते आले.
कोरोना काळानंतर चीनची अर्थव्यवस्था हादरलेली आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने चीनचा जीडीपी वृद्धी दर 2029 पर्यंत कमी होत होत 3.3 टक्क्यांवर येईल, असे भाकित वर्तविले आहे.
इंडिया रेटिंग्स अँड रिसर्चने मार्च तिमाहीसाठी 6.2 टक्के जीडीपी वृद्धी दराचा अंदाज वर्तविला होता. 2023-24 एकूण आर्थिक वर्षासाठी 6.9 ते 7 टक्क्यांचा अंदाज होता आणि भारताच्या प्रगतीने या अंदाजाची रेषा ओलांडली आहे.
* रिझर्व्ह बँकेच्या अंदाजित वृद्धी दराचा पल्लाही ओलांडला
* 2023-24 आर्थिक वर्षात जीडीपी वृद्धी दर 8.2 टक्के
* जानेवारी-मार्च 2024 चा जीडीपी वृद्धी दर 7.8 टक्के
वृद्धी दराची वाटचाल
जून तिमाहीत भारताचा वृद्धी दर 8.2 टक्के, सप्टेंबर तिमाहीत तो 8.1 टक्के, डिसेंबर तिमाहीत 8.4 टक्के, तर चौथ्या तिमाहीत 7.8 टक्के राहिला.