Gautam Adani US Court : गौतम अदानी यांना अमेरिकन न्यायालयाचा दिलासा; लाचखोरी, फसवणुकीचे फौजदारी खटले कायमचे रद्द

अमेरिकेच्या न्याय विभागाच्या अर्जानंतर न्यायालयाचा निर्णय, दोन वर्षांपासून सुरू असलेल्या ‘क्रिमिनल केस’ला पूर्णविराम
Gautam Adani US Court : गौतम अदानी यांना अमेरिकन न्यायालयाचा दिलासा; लाचखोरी, फसवणुकीचे फौजदारी खटले कायमचे रद्द
Published on
Updated on

न्यूयॉर्क / नवी दिल्ली : अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी आणि त्यांचे पुतणे सागर अदानी यांच्या विरोधात अमेरिकेत दाखल असलेले सर्व गुन्हेगारी खटले तेथील न्यायालयाने कायमचे रद्द (Dismissed with prejudice) केले आहेत. अमेरिकेच्या ईस्टर्न डिस्ट्रिक्ट ऑफ न्यू यॉर्कच्या न्यायमूर्ती निकोलस गराऊफिस यांनी हा महत्त्वपूर्ण निर्णय दिला असून यामुळे जवळपास दोन वर्षांपासून सुरू असलेल्या लाचखोरी आणि आर्थिक गैरव्यवहाराच्या प्रकरणाला पूर्णविराम मिळाला आहे.

अमेरिकेच्या न्याय विभागाने 'रूल ४८(अ)' अंतर्गत गौतम अदानी, सागर अदानी आणि अदानी ग्रीनचे माजी सीईओ विनित जैन यांच्यावरील आरोपपत्र मागे घेण्याची याचिका दाखल केली होती. या याचिकेत सिक्युरिटीज फ्रॉड, वायर फ्रॉड आणि आर्थिक फसवणुकीच्या कटाशी संबंधित आरोपांचा समावेश होता. न्यायालयाने सरकारी वकिलांचे स्पष्टीकरण विचारात घेत ही याचिका मंजूर केली.

‘विथ प्रेज्युडिस’ म्हणजे काय?

‘विथ प्रेज्युडिस’ या कायदेशीर तरतुदीनुसार खटला बंद करण्यात आल्यामुळे अमेरिकन सरकार किंवा कोणतीही संस्था भविष्यात याच आरोपांखाली गौतम अदानी किंवा त्यांच्या सहकाऱ्यांवर पुन्हा खटला दाखल करू शकत नाही. हा निर्णय म्हणजे गुन्ह्याबद्दलचा कोणताही न्यायिक निष्कर्ष किंवा निकाल नसला तरी यामुळे कायदेशीर कारवाई पूर्णपणे संपुष्टात आली आहे.

प्रकरणाची पार्श्वभूमी

हे प्रकरण नोव्हेंबर २०२४ मध्ये समोर आले होते, जेव्हा अमेरिकन वकिलांनी आरोप केला होता की, अदानी समूहाने भारतातील सौरऊर्जा कंत्राटे मिळवण्यासाठी भारतीय अधिकाऱ्यांना २५० दशलक्ष डॉलरची लाच देण्याचे आश्वासन दिले होते आणि अमेरिकन गुंतवणूकदारांची दिशाभूल केली होती. मात्र, अदानी समूहाने हे सर्व आरोप सुरुवातीपासूनच फेटाळून लावले होते. आपण सर्व कायदेशीर नियमांचे पालन केल्याचे स्पष्ट केले होते.

गौतम अदानी यांच्‍याकडून स्‍वागत

न्यायालयाच्या या निर्णयाचे स्वागत करताना गौतम अदानी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर म्हटले, मी अमेरिकन न्यायालयाच्या या निर्णयाचे पूर्ण नम्रतेने व न्यायव्यवस्थेबद्दलच्या आदराने स्वागत करतो. या कठीण काळात आमचा सत्य, निष्पक्षता आणि कायद्याच्या राज्यावरील विश्वास अढळ राहिला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news