

विजय जाधव
थुंबा (इस्रो) : (विक्रम साराभाई अंतराळ संशोधन केंद्र) : भारताच्या पहिल्या मानवी अंतराळ मोहीम ‘गगनयान’साठी आवश्यक असलेल्या व्हेईकल डिझाईन आणि क्रू मॉड्यूल सेफ्टी सिस्टीम्सवर (व्हीएसएससी) येथील विक्रम साराभाई अंतराळ संशोधन केंद्रात काम सुरू आहे. २०२७ आणि २०२८ मध्ये ही मोहीम राबवली जाणार असून तीन टप्प्यांत त्यावर काम सुरू असल्याची माहिती ‘इस्रो’च्या सूत्रांनी शनिवारी दिली. चंद्रावर पहिले पाऊल टाकण्याच्या दिशेने ही महत्त्वपूर्ण वाटचाल समजली जाते.
अंतराळ संशोधनात स्वयंपूर्ण होण्याच्या दिशेने भारताने महत्त्वाचे पाऊल टाकले असून येत्या काळात केल्या जाणाऱ्या अंतराळ मोहिमांमध्ये स्वदेशी उपग्रह आणि स्वदेशी लॉन्चर वापरण्याच्या दृष्टीने सुरू केलेले प्रकल्प अंतिम टप्प्यात आहेत, असे ‘इस्रो’च्या सूत्राने सांगितले. स्वदेशी तंत्रज्ञान वापरून तयार केलेले रॉकेट प्रक्षेपित करून इतिहास घडविण्याचा संकल्प ‘इस्रो’ने केला आहे. ‘गगनयान’ मोहीम नियोजित वेळेपेक्षा वर्षभराने लांबली असून पुढील वर्षी मोहिमेच्या पहिल्या टप्प्यास सुरुवात होईल आणि ‘गगनयान’ अंतराळाच्या दिशेने झेपावेल, त्यासाठीची तयारी पूर्ण झाली आहे. याशिवाय, भारताचे पहिले अंतराळ स्थानक उभारण्याच्या दृष्टीने भारताने दमदार पाऊल टाकले असून त्यावरही मोठ्या गतीने काम सुरू आहे. २०२८ मध्ये याचे पहिले मॉड्यूल प्रक्षेपित केले जाईल. त्यावरही टप्प्याटप्प्याने काम होणार असून २०३५ मध्ये ते पूर्ण कार्यक्षमतेने सुरू केले जाईल, असे या सूत्राने सांगितले. २०४० पर्यंत चंद्रावर भारतीय माणूस पाठवण्याच्या महत्त्वाकांक्षी योजनेचे हे पहिले पाऊल समजले जाते.
चर्चमध्ये ‘इस्रो’चे पहिले कार्यालय
सुरुवातीच्या काळात या परिसरातील सेंट मेरी मॅग्डालेन चर्च ही स्थानिक मच्छीमार समुदायाची एकमेव इमारत अस्तित्वात होती. मच्छीमार समुदायाने ही इमारत ‘इस्रो’ अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेला दान केली. याच ठिकाणी ‘इस्रो’चे पहिले कार्यालय-प्रयोगशाळा स्थापन करण्यात आली. अशा परिस्थितीत झालेल्या सुरुवातीतून भारताने २१ नोव्हेंबर १९६३ रोजी नायके-अपाचे (Nike-Apache) हे पहिले साऊंडिंग रॉकेट प्रक्षेपित केले होते. हे प्रक्षेपण स्थानक आजही नियमितपणे कार्यरत असून इथून दर महिन्याच्या तिसऱ्या बुधवारी साऊंडिंग रॉकेटस्चे प्रक्षेपण केले जाते.
भारतीय अंतराळ स्थानक
‘गगनयान’च्या यशानंतर भारत अंतराळात स्वतःचे ‘स्पेस स्टेशन’ उभारण्याच्या दिशेने पाऊल टाकत आहे.
स्वरूप व वजन : भारतीय अंतराळ स्थानकाचे एकूण वजन सुमारे ५२ टन असण्याची शक्यता आहे, जे टप्प्याटप्प्याने अंतराळात एकत्र जोडले जाईल.
उद्दिष्ट : सूक्ष्म-गुरुत्वाकर्षण वातावरणात वैज्ञानिक संशोधन, औषधनिर्मिती, खगोलशास्त्र आणि दीर्घकालीन अंतराळ प्रवासाचे प्रयोग करणे.