

पुढारी ऑनलाईन डेस्क: Gaganyaan Mission | भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने महत्त्वाकांक्षी गगनयान मोहिमच्या दिशेने आज (दि.१३) एक महत्त्वाचे पहिले यशस्वी पाऊल टाकले आहे. या संदर्भातील महत्त्वाची अपडेट इस्रोने त्यांच्या अधिकृत एक्स (x) अकाऊंटवरून दिली आहे.
इस्रोने X पोस्टमध्ये म्हटले आहे की, "भारताच्या महत्त्वाकांक्षी गगनयान मोहिमेने पहिल्या सॉलिड मोटर सेगमेंटचे प्रक्षेपण संकुलात यशस्वी स्थलांतर केले आहे. मानवी अंतराळ उड्डाणासाठी भारताच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी सज्ज असलेल्या HLVM3 G1 उड्डाणाच्या तयारीसाठी हा एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे. त्यामुळे भारताचे मानवी अंतराळ उड्डाणाचे स्वप्न आता आकार घेत असल्याचे देखील इस्रोने म्हटले आहे.
भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (इस्रो) नेतृत्वाखाली गगनयान मोहिमेचे उद्दिष्ट क्रू-अवकाश मोहिमा करण्याची भारताची क्षमता प्रदर्शित करणे हे आहे. हे मानव-रेटेड लाँच व्हेईकल (HLVM3) अंतराळवीरांना पृथ्वीच्या खालच्या कक्षेत नेण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल. पहिले क्रू-अवकाश मोहीम २०२६ च्या अखेरीस नियोजित आहे. तत्पूर्वी सॉलिड मोटर सेगमेंट ट्रान्सफर हे रॉकेटच्या पहिल्या टप्प्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल आहे, असे देखील इस्रोने सांगितले आहे.
इस्रो या ऐतिहासिक मोहिमेकडे सातत्याने प्रगती करत आहे. व्यापक अंतराळवीर प्रशिक्षण, प्रणोदन प्रणाली चाचण्या आणि प्रक्षेपण दरम्यान सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी डिझाइन केलेल्या क्रू एस्केप सिस्टमचे एकत्रीकरण या सर्व गोष्टी भारतीय अंतराळ संंशोधन संस्थेकडून चालू आहेत. भारताचा गगनयान कार्यक्रम २०२५ च्या अखेरीस क्रू नसलेल्या चाचणी उड्डाणाने सुरू होणार आहे, त्यानंतर अतिरिक्त क्रू नसलेल्या मोहिमा सुरू होतील.
ही यंत्रणा सुरळीत कार्यान्वित झाल्यानंतरच मानवी अंतराळ उड्डाण करण्यात येणार आहे. यामध्ये गगनयान अंतराळयान ४०० किलोमीटर उंचीवर तीन अंतराळवीरांना घेऊन जाईल आणि पृथ्वीभोवती फिरत राहील. हे अभियान भारतासाठी एक महत्त्वपूर्ण तांत्रिक आणि पायाभूत सुविधांमध्ये ऐतिहासिक झेप असल्याचे देखील अंतराळ संशोधकांनी म्हटले आहे. आज (दि.१३) पार पडलेली सॉलिड मोटर सेगमेंटची यशस्वी हालचाल भारताच्या मानवी अंतराळ उड्डाण क्षमतांना पुढे नेण्याच्या इस्रोच्या योजना दर्शवत आहे.