'माझा कुत्रा फार आजारी आहे'; टाटांनी नाकारला होता ब्रिटिश राजघराण्याचा सत्कार
पुढारी ऑनलाईन डेस्क : ही घटना २०१८ची आहे. आताचे ब्रिटनचे राजे किंग चार्लस तेव्हा प्रिन्स ऑफ वेल्स होते. रतन टाटा यांचा तेव्हा ब्रिटनमध्ये चार्ल्स यांच्या हस्ते सत्कार होणार होता. टाटा यांचे सामाजिक योगदान लक्षात घेऊन ब्रिटिश एशियन ट्रस्टने बकिंगहॅम पॅलेसमध्ये हा सत्कार समारंभ ठेवला होता. रतन टाटा यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची तयारीही दर्शवली होती. (Ratan Tata Love for Dogs)
याच समारंभाला टाटा यांचे मित्र सुहेल सेठ उपस्थित राहाणार होते. कार्यक्रमाच्या दिवशी टाटा यांनी सेठ यांना ११ वेळा कॉल केला. सेठ यांनी तातडीने टाटांना परत कॉल केला. टाटा यांनी अत्यंत नम्रपण या समारंभाला येणे शक्य होणार नसल्याचे सांगितले. "टाटांच्याकडे टँगो आणि टिटो नावाचे दोन श्वान आहेत. त्यातील एक फार आजारी होता. या आजारपणात या श्वानाला एकटे सोडून येणे मला योग्य वाटत नाही, असे टाटांनी कळवले," सेठ यांनी व्हिडिओ शेअर करत ही माहिती दिली आहे.
टाटा कार्यक्रमाला येऊ शकत नाहीत, ही बातमी चार्ल्स यांना समजली, आणि या मागचे कारणही त्यांना कळवण्यात आले. कारण ऐकताच चार्ल्स यांनी टाटांचे कौतुक केले. "याला म्हणतात मानवता आणि ती रतन टाटांमध्ये आहे. म्हणूनच हाऊस ऑफ टाटा ग्रेट आहे," असे कौतुक चार्ल्स यांनी केले होते.
रतन टाटा यांचे मंगळवारी रात्री निधन झाले. टाटा यांनी उद्योगांच्या बरोबरीनेच समाजिक क्षेत्रातही भरीव योगदान दिलेले आहे. पाळीव प्राण्यांबद्दल त्यांच्या मनात विशेष ममत्व होते, आणि ते अशा अनेक गोष्टींतून दिसून आलेले आहे. (Ratan Tata Love for Dogs)
बाँबे हाऊस आणि ताज हॉटेल परिसरात कुत्र्यांना मुक्त वावर
टाटा समूहाचे मुख्यालय असलेले बाँबे हाऊस आणि जगप्रसिद्ध ताज हॉटेलमध्ये भटक्या कुत्र्यांना कोणीही हुसकवून लावत नाही. उलट या ठिकाणी या कुत्र्यांची चांगली काळजी घेतली जाते. बाँब हाऊसचे २०१८मध्ये नूतनीकरण झाले, यामध्ये तळमजल्यावर कुत्र्यांसाठी स्वतंत्र जागा ठेवण्यात आलेली आहे.
'गोवा' आवडता श्वान
बाँबे हाऊसमध्ये 'गोवा' नावाचा एक श्वान आहे, हा टाटांचा फार लाडका आहे. टाटा यांचे एक सहकारी गोव्यातून येत असताना त्यांच्या कारमध्ये हे भटके पिल्लू येऊन बसले होते. या सहकाऱ्याने हे पिल्लू बाँबे हाऊसमध्ये आणले, म्हणून याचे नाव गोवा ठेवण्यात आलेले आहे. (Ratan Tata Love for Dogs)
टाटांनी त्यांच्या सोशल मीडियावर प्राण्यांबद्दल प्रेम, जिव्हाळा व्यक्त करणाऱ्या पोस्ट शेअर केल्या आहेत, तसेच सर्वसामान्यांना प्राण्यांची काळजी घेण्याचे आवाहनही त्यांनी सातत्याने केले आहे.
पाळीव प्राण्यांसाठी हॉस्पिटल | Ratan Tata Love for Dogs
मुंबईत विविध अडथळ्यांची शर्यत पूर्ण करत टाटा ट्रस्टने २२ एकर परिसरात १६५ कोटी रुपये खर्चून पाळीव प्राण्यांसाठी २४ तास सेवा देणारे हॉस्पिटल साकारले. हे हॉस्टिपल देशातील सर्वात मोठ्या पशुवैद्यकीय रुग्णालयापैकी एक ठरणार ठरले आहे. पशुवैद्यकीय रुग्णालयाची कल्पना कशी सूचली? याबाबत रतन टाटा यांनी सांगितले होतं की, "ते एकदा अमेरिका दौर्यावर आपल्या पाळीव कुत्र्याला घेवून जाणार होते. विमान प्रवासापूर्वी कुत्र्याच्या सांध्याला दुखापत झाली. त्यावेळी त्याला वेळेत उपचार मिळाले असते तर तो पूर्ण बरा झाला असता; पण उपचाराला विलंब झाला. कुत्र्याचा सांधा एका विशिष्ट स्थितीत गोठवला गेला. तेव्हाच मुंबईत जागतिक दर्जाचे पशुवैद्यकीय रुग्णालय असावे, अशी कल्पना रतन टाटा यांना सूचली आणि त्यांनी याचा पाठपुरावा सुरु केला होता." (Ratan Tata Love for Dogs)
एकाचवेळी 200 प्राण्यांवर उपचाराची सुविधा | Ratan Tata Love for Dogs
ब्रिटनमधील पशुवैद्यक (प्राण्यांचे डॉक्टर ) थॉमस हेथको यांच्या नेतृत्त्वाखाली पाच मजली हॉस्पिटलमध्ये एकाचवेळी २०० प्राण्यांवर उपचाराची सोय आहे. लंडनमधील रॉयल व्हेटर्नरी कॉलेजसह पाच पशुवैद्यकीय महाविद्यालयांशी प्रशिक्षणाचा करारही झाला आहे. हे रुग्णालय पाळीव प्राण्यांचे आजारांचे निदान, शस्त्रक्रिया आणि औषध सेवा देणार आहे.

