पुढारी ऑनलाईन डेस्क: २०२४ मध्ये भारताने अनेक नैसर्गिक आपत्तींचा सामना केला, ज्यामुळे जीवित आणि वित्तहानी झाली. सरत्या वर्षात प्राणघातक चक्रीवादळांपासून ते मुसळधार पाऊस, भूस्खलनापर्यंत, अत्यंत हवामानविषयक घटना घडल्याचे वृत्त 'हिंदुस्थान टाईम्स'ने दिले आहे.
सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायर्नमेंट (CSE) च्या एका अहवालात म्हटले आहे की, "या वर्षाच्या पहिल्या नऊ महिन्यांत भारताला २७४ पैकी २५५ दिवस हवामान बदलाच्या घटनांचा सामना करावा लागला. यामध्ये उष्णता आणि थंडीच्या लाटा, चक्रीवादळे, वीज कोसळणे, मुसळधार पाऊस, पूर आणि भूस्खलन यासारख्या नैसर्गिक आपत्तींचा सामना करावा लागला. या घटनांमध्ये ३,२३८ लोकांचा मृत्यू झाला. केरळमध्ये सर्वाधिक (५५०) मृत्यू झाले, त्यानंतर मध्य प्रदेश (३५३) आणि आसाम (२५६) यांचा क्रमांक लागतो. मध्य प्रदेशात २७४ दिवसांपैकी १७६ दिवस अत्यंत तीव्र हवामानाचा सामना करावा लागला, जो देशातील सर्वाधिक नैसर्गिक आपत्ती आहेत.
मे महिन्यात, चक्रीवादळ 'रेमल'मुळे आलेल्या मुसळधार पाऊस आणि वादळामुळे मिझोराम, आसाम, नागालँड, मेघालय आणि पश्चिम बंगाल 'या' ईशान्येकडील राज्यांमध्ये ३५ हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. चक्रीवादळामुळे मोठ्या प्रमाणात भूस्खलन आणि पुरामुळे घरे आणि मालमत्तेचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. २६ मे च्या मध्यरात्री बांगलादेश आणि लगतच्या पश्चिम बंगालमध्ये वादळ धडकले, किनारपट्टीवर १३५ किमी प्रतितास वेगाने वारे वाहत होते. सोमवारी वीजवाहिन्या तुटल्याने भारत आणि पश्चिम बंगालमध्ये लाखो लोक वीजेशिवाय राहिले.
मुसळधार पावसामुळे ३० जुलै रोजी वायनाडमधील मुंडक्काई-चूरलमाला भागात भूस्खलन झाले आणि त्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, ज्यामध्ये किमान २५४ लोकांचा मृत्यू झाला. भूस्खलनामुळे घरे, शाळा, मंदिरे आणि दुकाने पूर्णपणे जमिनीखाली गेली. ३० जुलै रोजी केरळमध्ये झालेल्या मान्सूनच्या अपवादात्मक पावसानंतर भूस्खलन झाले. जिल्ह्यात एकाच दिवसात १४० मिमी पेक्षा जास्त पाऊस पडला, जो लंडनच्या वार्षिक पावसाच्या जवळजवळ एक चतुर्थांश इतका होता.
हिमाचल प्रदेशात ३१ जुलैच्या रात्री अनेक भूस्खलन आणि अचानक आलेल्या पुरात २५ हून अधिक लोकांचा मृत्यू झाला. सर्वात जास्त नुकसान झालेल्या जिल्ह्यांमध्ये मंडी, चंबा आणि कांगडा हे सर्वात जास्त नुकसानग्रस्त जिल्हे होते. शिमला आणि कुल्लू जिल्ह्याच्या सीमेवरील समेज गावाला सर्वाधिक फटका बसला, जिथे मुसळधार पावसामुळे आलेल्या पुरात सुमारे ६० घरे पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आणि ३५ घरांचे अंशतः नुकसान झाले.
फेंगल चक्रीवादळाने १ डिसेंबर रोजी पुद्दुचेरी आणि तामिळनाडूच्या किनाऱ्यावर धडक दिली. या चक्रीवादळामुळे तामिळनाडूच्या १४ जिल्ह्यांमध्ये अभूतपूर्व विनाश झाला, ज्यामुळे १.५ कोटी लोक प्रभावित झाले, २.११ लाख हेक्टर शेती पाण्याखाली गेली आणि महत्त्वाच्या पायाभूत सुविधांचे नुकसान झाले. किमान १२ जणांचा मृत्यू झाला.