प्रवासी रेल्वेला मालगाडीची धडक; 15 ठार, 60 जखमी

प्रवासी रेल्वेला मालगाडीची धडक; 15 ठार, 60 जखमी
Published on
Updated on

कोलकाता, वृत्तसंस्था : कांचनजंगा एक्स्प्रेस या प्रवासी रेल्वेगाडीवर मागून येणारी मालगाडी धडकल्याने झालेल्या अपघातात 15 जण ठार झाले, तर 60 जण जखमी झाले. पश्चिम बंगालमधील दार्जिलिंगलगत मुसळधार पाऊस सुरू असल्याने मालगाडीच्या लोकोपायलटला सिग्नल दिसला नाही. त्यामुळे ही दुर्घटना घडली. दुर्घटनेत कांचनजंगा एक्स्प्रेसच्या पाच डब्यांचे मोठे नुकसानही झाले.

दुर्घटनेनंतर लगेच बचावकार्याला सुरुवात करण्यात आली. आतापर्यंत 15 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृतांमध्ये दोन लोकोपायलट आणि एका गार्डचा समावेश आहे.

कांचनजंगा एक्स्प्रेस त्रिपुरातील आगरतळाहून पश्चिम बंगालच्या सियालदाहला जात होती. वाटेत रेड सिग्नल असल्याने एक्स्प्रेस सिलिगुडीच्या रंगपानी स्थानकाजवळ रुईधासालगत थांबलेली होती आणि अचानक मागून येणार्‍या मालगाडीने या गाडीला धडक दिली. यावेळी मुसळधार पाऊस सुरू होता. त्यामुळे मालगाडीच्या पायलटला सिग्नल दिसला नाही आणि हा अपघात झाला, असे कारण प्रथमदर्शनी समोर आलेले आहे.

मालगाडी वेगात असल्याने धडकही इतकी जोरदार होती की, एक्स्प्रेस ट्रेनचा एक डबा मालगाडीच्या इंजिनवर चढून मालगाडीवरून हवेत लटकला. मालगाडीच्या इंजिनाचा डबा तर अक्षरश: फुटला. हा डबा होत्याचा नव्हता झाला आणि यातले लोको पायलट आदी सगळेही.

इतर दोन डबे रुळावरून घसरलेले होते. राष्ट्रीय आणि राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागासह रेल्वे आणि अन्य शासकीय विभागांनी बचावकार्य राबविले. स्थानिक लोकांनीही यात हिरीरीने सहभाग नोंदविला. जिल्हाधिकार्‍यांसह पोलिस अधीक्षक डॉक्टरही घटनास्थळी दाखल झाले. रुग्णवाहिकांतून तातडीने जखमींना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.

केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या दुर्घटनेबद्दल दु:ख व्यक्त केले आहे. रेल्वे बोर्डाच्या अध्यक्षा आणि सीईओ जया वर्मा सिन्हा यांनी सांगितले की, या घटनेत मालगाडीचा चालक आणि सहायक चालक आणि कांचनजंगा एक्स्प्रेस ट्रेनच्या गार्डचा या दुर्घटनेत मृत्यू झाला आहे.

मृतांच्या कुटुंबीयांना 10 लाख रुपयांची मदत

अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना 10 लाख रुपये, गंभीर जखमींना 2.5 लाख रुपये आणि किरकोळ जखमींना 50 हजार रुपये मदत रेल्वे मंत्रालयाकडून जाहीर करण्यात आली आहे.

पंतप्रधानांकडूनही सहाय्य

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 50 लाख रुपयांची एक्स-ग्रेशिया रक्कम जाहीर केली आहे. प्रत्येक मृताच्या कुटुंबीयांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून दोन लाख रुपये दिले जातील. जखमींना 50 हजार रुपये देण्यात येणार आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news