

पुढारी ऑनलाईन डेस्क : केंद्र सरकारने मोफत आधार अपडेट करण्याची मुदत तीन महिन्यांनी वाढवली आहे. याआधीही ती तीन महिन्यांसाठी मुदत वाढवण्यात आली होती. त्यानंतर आधार अपडेट करण्याची शेवटची तारीख आज १४ सप्टेंबर होती, मात्र सरकारने पुन्हा एकदा दिलासा दिला असून, याचा फायदा देशातील कोट्यवधी लोकांना होणार आहे.
UIDAI ने दिलेल्या माहितीनुसार, 10 वर्षांपेक्षा जुने सर्व आधार अपडेट करणे अनिवार्य करण्यात आले आहे. जर तुमच्याकडे 10 वर्षांपेक्षा जुने आधार कार्ड असेल तर तुम्हाला ते अपडेट करावे लागेल, असेदेखील भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणने (UIDAI) सांगितले आहे. ही बातमी इकॉनॉमिक टाईम्सने दिली आहे.
भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने (UIDAI) त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, UIDAI ने मोफत ऑनलाइन दस्तऐवज अपलोड करण्याची सुविधा 14 डिसेंबर 2024 पासून पुन्हा वाढवण्यात आली आहे. ही मोफत सेवा फक्त #myAadhaar पोर्टलवर उपलब्ध आहे. UIDAI लोकांना त्यांच्या Aadhaar मध्ये कागदपत्रे अपडेट ठेवण्यासाठी प्रोत्साहित करत असल्याचे आधार प्राधिकरणाने म्हटले आहे.
आधार कार्ड हे भारत सरकारद्वारे भारतातील नागरिकांना जारी केलेले ओळखपत्र आहे. त्यावर १२ अंकी अद्वितीय क्रमांक छापलेला आहे. जो भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने जारी केला आहे. हा क्रमांक भारतात कुठेही व्यक्तीची ओळख आणि पत्त्याचा पुरावा असेल, असेही भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने सांगितले आहे.