Army Microlight Aircraft | महामार्गावर लष्कराच्या चार मायक्रोलाईट विमानांचे लँडिंग आणि टेक ऑफ!

अमृतसर-जामनगर इकॉनॉमिक कॉरिडॉरवर उतरून इंधन भरण्याची देशातील पहिलीच मोहीम केली यशस्वी
Army Microlight Aircraft |
Army Microlight Aircraft | महामार्गावर लष्कराच्या चार मायक्रोलाईट विमानांचे लँडिंग आणि टेक ऑफ!
Published on: 
Updated on: 

चंदीगड; वृत्तसंस्‍था : नागरी आणि लष्करी यंत्रणांमधील उत्तम समन्वयाचे दर्शन घडवत भारतीय लष्कराच्या चार मायक्रोलाईट विमानांनी गुजरातमधील अमृतसर-जामनगर इकॉनॉमिक कॉरिडॉरवर (एनएच-७५४ए) यशस्वी लँडिंग आणि टेक ऑफ केले. आपत्कालीन परिस्थितीत राष्ट्रीय महामार्गांचा हवाईपट्टी म्हणून वापर करण्याची क्षमता यातून सिद्ध झाली आहे. राष्ट्रीय महामार्गावर चार विमानांच्या ताफ्याने एकत्रितपणे उतरून इंधन भरण्याची ही देशातील पहिलीच यशस्वी मोहीम असल्याचे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

या ताफ्यात दोन फिक्स्ड-विंग मायक्रोलाईट विमाने आणि दोन पॉवर्ड हँग ग्लायडर्सचा समावेश होता. कांडला विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर ही विमाने गुजरातच्या पाटण जिल्ह्यातील सांतलपूर तालुक्यातील बाकुत्रा टोल प्लाझाजवळ महामार्गावर उतरली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर या सरावाचा व्हिडीओ शेअर केला आहे. ‘विंग्स ऑफ व्हॅलोर अँड युनिटी’ मोहिमेत सहभागी झालेल्या लष्कराच्या ‘टीम माऊंटन ईगल्स’ने महामार्गावरील किलोमीटर ९४६ ते ९४९ दरम्यान यशस्वी लँडिंग व टेक ऑफ केल्याचे त्यांनी सांगितले.

‘भारतीय लष्कर आणि ‘एनएचएआय’ मधील समन्वयाचे हे ऐतिहासिक प्रदर्शन आहे. जागतिक दर्जाच्या महामार्गांमुळे केवळ दळणवळण आणि आर्थिक विकासच होत नाही, तर सशस्त्र दलांच्या धोरणात्मक आणि आपत्कालीन गरजाही पूर्ण होतात. योग्य सुरक्षा उपाययोजनांसह महामार्गांचा वापर एअरो-ॲडव्हेंचर आणि पर्यटनासाठीही होऊ शकतो,’ असे गडकरी यांनी नमूद करत संपूर्ण टीमचे अभिनंदन केले.

‘विंग्स ऑफ व्हॅलोर अँड युनिटी’

या मोहिमेचे महू येथील मिलिटरी कॉलेज ऑफ टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगमधील (एमसीटीई) आर्मी ॲडव्हेंचर नोडल सेंटरतर्फे आयोजन करण्‍यात आले. १४ नोव्हेंबर रोजी मोहिमेला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. मध्य प्रदेश, गुजरात आणि राजस्थानचा प्रवास पूर्ण करून २८ नोव्हेंबर रोजी महू येथे तिचा समारोप होईल. या मोहिमेत ‘एक्स-एअर हनुमान’ व ‘सव्हाना एमएक्सपी ७४०’ ही मायक्रोलाईट विमाने, तसेच ‘टॅनार्ग बायोमिक्स’ व ‘न्युव्हिक्स स्कायपर हँग ग्लायडर्स’ सहभागी झाले होते. स्थानिक प्रशासन आणि ‘एनएचएआय’ने वाहतूक व सुरक्षेचे काटेकोर नियोजन केले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.