पुढारी ऑनलाईन डेस्क : झारखंडच्या संबलपूर गावात नर्सिंगचे प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या अमीर महतो यांची राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत सामुदायिक आरोग्य अधिकारीपदी नियुक्त करण्यात आली आहे. अशी नियुक्ती झारखंडच्या इतिहासात प्रथमच झाली आहे. झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी गुरुवारी (दि.२९) अमीर महतो यांना नियुक्ती पत्र सुपूर्द केले.
झारखंडमध्ये प्रथमच सरकारने पश्चिम सिंगभूम जिल्ह्यात एका तृतीयपंथीयची समुदाय आरोग्य अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी गुरुवारी (दि.२९) अमीर महतो यांना नियुक्ती पत्र सुपूर्द केले. महोत यांनी संबलपूर गावात नर्सिंगचे प्रशिक्षण पूर्ण केले. त्या राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत नियुक्ती करण्यात आलेल्या ३६५ उमेदवारांपैकी एक आहे.
महतो म्हणाले की, तिच्या आईची इच्छा होती की तिने परिचारिका व्हावे, परंतु घरच्या आर्थिक अडचणींमुळे ती आपला व्यवसाय करू शकली नाही. ती म्हणते, "माझ्या आईचे स्वप्न पूर्ण झाले आहे. माझी देवाकडे कोणतीही तक्रार नाही. मी खरोखर आनंदी आहे आणि झारखंडमध्ये समुदाय आरोग्य अधिकारी म्हणून माझी नियुक्ती होईल, असे कधीच वाटले नव्हते. असा पुढाकार घेतल्याबद्दल मी मुख्यमंत्री यांची आभारी आहे."
महतोच्या नियुक्तीमुळे, झारखंड हे बिहार, कर्नाटक, तामिळनाडू आणि पश्चिम बंगाल नंतरच्या काही राज्यांपैकी एक बनले ज्यामध्ये सरकारी विभागांमध्ये तृतीयपंथीयची नियुक्ती करण्याची तरतूद आहे. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये झारखंड मंत्रिमंडळाने तृतीयपंथीयांसाठी जागा राखीव ठेवण्यास मंजुरी दिली होती. राज्य सरकारने शैक्षणिक संस्थांमध्ये ओबीसी कोट्याअंतर्गत आणि तृतीयपंथीयांसाठी सरकारी नियुक्त्यांमध्ये आरक्षणाची तरतुद केली आहे.