.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
पुढारी ऑनलाईन डेस्क: त्रिपुरामध्ये सतत पाऊस आणि पुरामुळे परिस्थिती गंभीर बनली आहे. पुरात 22 जणांचा मृत्यू झाला असून दोन जण बेपत्ता आहेत. पायाभूत सुविधा, पिके आणि पशुधन यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मुसळधार पावसामुळे घरांचे नुकसान झाल्याने ६५ हजारांहून अधिक लोकांनी राज्यातील ४५० मदत छावण्यांमध्ये आश्रय घेतला आहे.
ईशान्येकडील राज्यात सुमारे १७ लाख लोकांना पुराचा फटका बसला आहे. मुख्यमंत्री माणिक साहा यांनी मृतांच्या कुटुंबीयांना १० लाख रुपयांची एक्स-ग्रॅशिया रक्कम जाहीर केली आहे. पूरग्रस्त त्रिपुरासाठी केंद्राने ४० कोटी रुपयांची मदत मंजूर केली आहे. शुक्रवारी भारताच्या ईशान्येकडील त्रिपुरा राज्यात मुसळधार पावसामुळे पूर आणि भूस्खलन झाल्यामुळे लाइफ बोटमधील सैनिकांनी लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
मुसळधार पावसामुळे रस्त्यावर गुडघाभर पाण्यात कार आणि बस अडकल्या होत्या. गुरुवारी मुसळधार पाऊस थांबल्याने शुक्रवारी सकाळपासून परिस्थिती काहीशी सुधारण्याची चिन्हे दिसू लागली असून, त्यामुळे खवळलेल्या गुमती, खोवई, फेणीसह प्रमुख नद्यांच्या पाणीपातळीत घट झाली आहे. अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री सुशांत चौधरी म्हणाले की, ईशान्येकडील राज्यात भीषण पूर येऊनही त्रिपुरामध्ये अन्नपदार्थ आणि इंधनाचा पुरेसा साठा आहे.
त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक साहा यांनी उदयपूर, अमरपूर आणि कारबुक भागातील पूरग्रस्त भागांचे हवाई सर्वेक्षण केले आणि अनेक मदत शिबिरांना भेट दिली. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले की, केंद्राने एनडीआरएफच्या 11 तुकड्या, लष्कराच्या तीन तुकड्या आणि भारतीय वायुसेनेची चार हेलिकॉप्टर राज्य सरकारला पूर मदत आणि बचाव कार्यात मदत करण्यासाठी तैनात केली आहेत.