नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा-
हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. यामध्ये मुख्यमंत्री नायाब सिंह सैनी यांच्यासह ६७ उमेदवार जाहीर करण्यात आले. मुख्यमंत्री नायाब सिंह सैनी हे लाडवा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत तर माजी मंत्री अनिल विज हे अंबाला कॅन्टोन्मेंट मतदारसंघातून उमेदवार आहेत. दरम्यान, पक्षाने काही विद्यमान मंत्र्यांसह आमदारांना वगळण्याचा निर्णय घेतला आहे. पहिल्या यादीत आठ महिलांचा समावेश आहे. हरियाणात ५ ऑक्टोबरला मतदान होणार असून ८ ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे.
मार्च २०२४ पर्यंत मनोहर लाल खट्टर हरियाणाचे मुख्यमंत्री होते. त्यानंतर त्यांच्या ठिकाणी कुरुक्षेत्रचे खासदार असलेले सैनी यांची निवड करण्यात आली होती. पुढे कर्नाल विधानसभा मतदारसंघातून पोट निवडणूक लढवत सैनी विधानसभेत आले होते. इतर उमेदवारांमध्ये माजी केंद्रीय मंत्री विनोद शर्मा यांच्या पत्नी शक्ती राणी शर्मा यांचा समावेश आहे, त्या कालका विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. तसेच जूनमध्ये काँग्रेस सोडून भाजपमध्ये दाखल झालेल्या खासदार किरण चौधरी यांच्या कन्या श्रुती चौधरी यांना तोशाममधून उमेदवारी देण्यात आली आहे.