पुढारी ऑनलाईन डेस्क : दिवाळीच्या पहिल्याच दिवशी केरळच्या कासारगोडमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. येथील एका मंदिरात कार्यक्रमादरम्यान फटाक्यांच्या साठ्यात मोठा स्फोट झाला. या घटनेत १५० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. सर्वांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.
अंजुतांबलम वीरकावू मंदिरात ही घटना घडली. मंदिरात वार्षिक कालियाट्टम उत्सव साजरा केला जात होता. कार्यक्रमासाठी फटाक्यांची ऑर्डर देण्यात आली होती. ते एका स्टोरेजमध्ये सुरक्षित ठेवले होते. दरम्यान, रात्री साडेबारा वाजता अचानक फटाके फुटू लागले आणि काही वेळातच आगीसह धुराचे लोट उसळले. स्फोटामुळे १५० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. यातील ९७ जखमींना विविध रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली.