

Filmy-style fraud by murder accused : तुरुंग प्रशासनाच्या हातावर तुरी देत कैदी पसार होतो, हा फिल्मी स्टाईल थरार तुम्ही अनेकवेळा पडद्यावर अनुभवला असेल. मात्र उत्तर प्रदेशमधील एका खुनातील आरोपीने चक्क तुरुंग प्रशासनाच्या ३० लाख रुपयांवर डल्ला मारल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांनी या प्रकरणी चौघांना ताब्यात घेतले आहे.
‘टाईम्स ऑफ इंडिया’ने दिलेल्या वृत्तानुसार, रामजित यादव हा बिलरियागंज पोलीस स्टेशनच्या हद्दीतील जमुआ शाहगढ गावाचा रहिवासी आहे. पत्नीच्या हत्येच्या आरोपाखाली २४ फेब्रुवारी २०२३ रोजी त्याला अटक झाली होती. त्याची रवानगी आझमगढ जिल्हा कारागृहात करण्यात आली.
रामजित यादव याने अत्यंत थंड डोक्याने तुरुंग प्रशासनाच्या रकमेसह फसवणुकीचा प्लॅन आखला. त्याला २० मे २०२४ रोजी जामीन मिळाला. तुरुंगातून बाहेर पडताना त्याने तुरुंगाचे चेकबुक चोरले.या प्रकरणी सहाय्यक पोलीस अधीक्षक मधुवन कुमार सिंह यांनी सांगितले की, चौकशीत हे उघड झाले आहे की खून प्रकरणातील आरोपी रामजित यादव याने कैदी शिव शंकर उर्फ गोरख, वरिष्ठ लिपिक मुशीर अहमद आणि तुरुंग रक्षक अवधेश कुमार पांडे यांच्या मदतीने तुरुंग अधीक्षकांच्या नावाने चालवलेल्या बँक खात्यातून सुमारे ३० लाख रुपये स्वतःच्या खात्यात वळवले.
बँक खात्यातून २.६ लाख रुपयांची संशयास्पद रक्कम काढण्यात आली आहे, याची माहिती २२ सप्टेंबर २०२५ रोजी तुरुंग अधीक्षक आदित्य कुमार सिंह यांना मिळाली. सिंह यांनी तुरुंगाच्या वरिष्ठ लेखा विभाग प्रमुख मुशीर अहमद यांना पैसे काढण्याबद्दल विचारले. मात्र त्यांनी याबाबत कोणतीही माहिती नसल्याचे सांगितले.त्यानंतर तुरुंग प्रशासनाने खातेविवरण तपासले आणि अंतर्गत चौकशी सुरू केली. चौकशीत तुरुंगातील कर्मचारी आणि एका अन्य कैद्याचा सहभाग उघड झाला.
रामजित यादव याने अतिशय थंड डोक्याने तुरुंगाच्या बँक खात्यावर डल्ला मारण्याचा प्लॅन तयार केला. त्याने सर्वप्रथम तुरुंगातील कर्मचार्यांचा विश्वास संपादन केला आणि त्यांना आपण ठेकेदार असल्याचे सांगितले.जामिनावर सुटण्यापूर्वी रामजित यादव याने तुरुंग अधीक्षकांच्या नावे असणारे चेकबुक चोरले. त्यावर त्याने तुरुंग अधीक्षक आदित्य कुमार सिंह यांची बनावट स्वाक्षरी केली. या संपूर्ण फसवणुकीत त्याला कैदी शिव शंकर उर्फ गोरख, वरिष्ठ लिपिक मुशीर अहमद आणि तुरुंग रक्षक अवधेश कुमार पांडे या तिघांनी मदत केली. पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेतले आहे. खुनातील आरोपीने तुरुंग प्रशासनाच्या ३० लाखांवर मारलेला डल्ला सध्या उत्तर प्रदेशमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे.