

Madhya Pradesh Scam
रिवा (मध्य प्रदेश) : मध्य प्रदेशातील रिवा जिल्ह्यातील शिक्षण विभागात एक चकित करणारा घोटाळा समोर आला आहे. एका व्यक्तीने बनावट कागदपत्रांच्या आधारे आपली आई मृत असल्याचे दाखवत सरकारी नोकरी मिळवली. पण जेव्हा सत्य समोर आले, तेव्हा हा फसवणुकीचा प्रकार अनेकपटींनी गंभीर निघाला.
गेल्या वर्षभरात अनुकंपा तत्वावरील 36 नियुक्त्या करण्यात आल्या. त्यातील 10 उमेदवारांनी कागदपत्रांसाठी नोटीसला प्रतिसाद दिला नाही. तपासाअंती त्यातील पाच नियुक्त्या बनावट निघाल्या आहेत.
पारसिया गावचा रहिवासी बृजेश शिवचरण कोल याने दावा केला की त्याची आई बेला काली कोल, जी शिक्षिका म्हणून कार्यरत होती, तिचा मृत्यू झाला आहे. या खोट्या दाव्याचा आधार घेत त्याने "अनुकंपा नियुक्ती" अंतर्गत जौडोरी (गंगेव ब्लॉक) येथील शासकीय उच्च माध्यमिक शाळेत शिपाई पदावर नोकरी मिळवली.
पण धक्कादायक बाब म्हणजे – बेला काली कोल कधीच शिक्षण विभागात नोकरीवर नव्हती आणि बृजेश कोलचा तिच्याशी कोणताही संबंध नव्हता!
शाळेचे प्राचार्य यांनी वेतन प्रक्रियेदरम्यान कागदपत्रात तफावत आढळल्याची तक्रार केली. त्यानंतर जिल्हा शिक्षण अधिकारी (DEO) सुधामा गुप्ता यांनी तत्काळ तीन सदस्यीय चौकशी समिती गठीत केली. चौकशीत उघड झाले की, अशा पद्धतीने आणखी पाच बनावट नियुक्त्या झाल्या आहेत.
बनावट नियुक्त्या करणारे इतर आरोपी: ओमप्रकाश कोल, सुषमा कोल, विनय रावत, हिरामणी रावत, रमा द्विवेदी.
ही नियुक्ती विविध तालुक्यांमधील (टिघरा, बिडा, अटारिया, सिमरिया आणि गंगेव) शाळांमध्ये करण्यात आली होती. सर्वांनी खोटे मृत्यू प्रमाणपत्र, पोलिस तपास अहवाल, शपथपत्रे आदी सादर केली होती.
रिवा जिल्हाधिकारी प्रतिभा पाल यांनी याची गंभीर दखल घेत दोषी लिपिकाला निलंबित केले असून, चौकशी अधिकाऱ्यांवर आणि DEO वर शिस्तभंगाची शिफारस केली आहे. त्या म्हणाल्या की, "नियुक्त्या करताना कोणतीही वैध प्रक्रिया पाळलेली नाही.
पाच बनावट नियुक्त्या आढळल्या आहेत. अर्जदारांसह संबंधित लिपिकावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे."
रिवा पोलिस अधीक्षक (ASP) आरती सिंग यांनी सांगितले की, "या प्रकरणात फसवणूक, बनावट कागदपत्रे तयार करणे यासारख्या विविध कलमांखाली सिव्हिल लाईन्स पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
डिसेंबर 2024 ते एप्रिल 2025 दरम्यानच्या काळात ही बनावट नियुक्त्यांची मालिका सुरू होती."