पुढारी ऑनलाईन डेस्क : देशात आधार कार्डला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. नागरिकत्वाचा पुराव्यासोबतच, बँक खाते उघडण्यापासून ते जमीन किंवा घर खरेदी करण्यापर्यंत सर्व गोष्टींसाठी आधार कार्ड आवश्यक आहेत. दरम्यान,आधार कार्ड अपडेट करणे महत्त्वाचे आहे. सध्या UIDAI मोफत आधार कार्ड अपडेट करण्याची सुविधा देत आहे. आता UIDAI ने आधार कार्ड अपडेट करण्याची मुदत सप्टेंबरपर्यंत वाढवली आहे.
पुन्हा एकदा UIDAI ने आधार कार्ड मोफत अपडेट करण्याची अंतिम मुदत वाढवली आहे. यापूर्वी ही मुदत 14 जून 2024 होती, ती आता 14 सप्टेंबर 2024 पर्यंत वाढवण्यात आली आहे. म्हणजेच ज्यांनी अद्याप आधार कार्ड अपडेट केलेले नाही, ते 14 सप्टेंबरपर्यंत कोणतेही शुल्क न घेता आधार अपडेट करू शकतात.
आधार कार्ड अपडेट करण्यासाठी अनेकवेळा मुदत वाढवण्यात युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाने (UIDAI) 10 वर्षांपूर्वी बनवलेले आधार कार्ड मोफत अपडेट करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्याची अंतिम मुदत अनेकवेळा वाढवण्यात आली आहे. गेल्या मार्चमध्ये देखील या सेवेचा मोफत वापर करण्याची अंतिम तारीख 14 मार्चपासून 14 जून 2024 पर्यंत वाढवण्यात आली होती. आता ती 14 जून ते 14 सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. आता मोफत आधार कार्ड अपडेट करण्यासाठी नागरिकांना दोन महिन्यांची मुदत देण्यात आली आहे.
आधार कार्ड मोफत अपडेट करण्यासाठी शेवटची मुदच 14 सप्टेंबर 2024 पर्यंत आहे. यानंतर आधार कार्ड अपडेट करण्यासाठी नागरिकांना पैसे भरावे लागणार आहेत. विशेष बाब म्हणजे UIDAI द्वारे प्रदान केलेली आधार कार्ड अपडेट करण्याची ही मोफत सेवा फक्त myAadhaar पोर्टलवर उपलब्ध आहे. या सेवेची अंतिम मुदत वाढवताना, UIDAI ने सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितले होते की, लोकांना त्यांच्या आधारमधील कागदपत्रे अपडेट करण्यासाठी प्रोत्साहित केले जात आहे.