

NEET, JEE Exam : देशभरातील लाखो विद्यार्थ्यांचे वैद्यकीय आणि अभियांत्रिकी शाखांतील प्रवेशाचे भविष्य निश्चित करणाऱ्या JEE, NEET UG आणि CUET UG परीक्षांसाठी राष्ट्रीय चाचणी संस्थेने (NTA) विद्यार्थ्यांना आणि पालकांना एक महत्त्वाची सूचना जारी केली आहे. यापुढे विद्यार्थ्यांना आधार कार्डावरील पत्त्यावर आधारित परीक्षा केंद्र वाटप केले जाणार आहे.
राष्ट्रीय चाचणी संस्थेने (NTA) विद्यार्थ्यांना आणि पालकांना एक नोटीस जारी करत सूचित केले आहे की, NEET UG आणि CUET UG परीक्षांसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी विद्यार्थ्यांनी त्यांच्या आधार कार्डावरील पत्ता आणि इतर माहिती अद्ययावत करावी.एकदा अर्ज प्रक्रिया सुरू झाल्यानंतर कोणतेही बदल करता येणार नाहीत. २०२६-२७ शैक्षणिक वर्षासाठी राष्ट्रीय प्रवेश परीक्षा सुरू होणार असून, ही प्रक्रिया JEE मेन २०२६ च्या जानेवारी सत्रापासून सुरू होईल.म्हणून, उमेदवारांनी आधार कार्डामधील आवश्यक ते सर्व बदल वेळीच करून ठेवावेत, असा सल्ला राष्ट्रीय चाचणी संस्थेने दिला आहे.
आधार कार्ड आणि दहावीच्या प्रमाणपत्रावरील जन्मतारीख, नाव व इतर माहिती जुळली पाहिजे. कोणत्याही प्रकारची तफावत आढळल्यास अर्ज नाकारण्यात येऊ शकतो.शिवाय, परीक्षा केंद्रही आता आधार कार्डावरील पत्त्यावरून निश्चित केले जाणार असल्याने, आधारवरील पत्त्याची खात्री करून घ्यावी, असेही राष्ट्रीय चाचणी संस्थेचे आवाहन आहे.
दिव्यांग, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, ओबीसी, आणि ईडब्ल्यूएस (राखीव प्रवर्ग) विद्यार्थ्यांनी त्यांच्या प्रमाणपत्रांतील सर्व माहिती आधार कार्ड आणि दहावीच्या प्रमाणपत्राशी सुसंगत ठेवावी.ऑनलाइन अर्ज भरल्यानंतर ही प्रमाणपत्रे बदलता येणार नाहीत, असेही NTAने आपल्या सूचनेत नमूद केले आहे.