NEET UG Result 2025 | नीट यूजी परीक्षेत उत्तर प्रदेशची बाजी, महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी

महाराष्ट्रातील कृष्णांग जोशी तिसरा, आरव अग्रवाल दहावा
NEET UG Result 2025 |
प्रातिनिधिक छायाचित्र.File Photo
Published on
Updated on

नवी दिल्ली : राष्ट्रीय चाचणी संस्थेने (एनटीए) राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा (नीट) यूजी २०२५ चा निकाल शनिवारी जाहीर केला. यामध्ये राजस्थानच्या महेश कुमारने ७२० पैकी ६८६ गुण मिळवत देशात प्रथम क्रमांक पटकावला. महाराष्ट्रातील दोन विद्यार्थी देशातील पहिल्या दहामध्ये आहेत. यामध्ये  कृष्णांग जोशी ६८१ गुण मिळवत देशात तिसरा तर ६७५ गुणांसह आरव अग्रवाल दहाव्या क्रमांकावर आहे. दिल्लीतील विद्यार्थिनी अविका अग्रवाल ६८० गुणांसह मुलींमध्ये प्रथम असून देशात तिचा पाचवा क्रमांक आहे.

वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी देशपातळीवर दरवर्षी नीट-यूजी परीक्षा घेतली जाते. यंदाची परीक्षा ४ मे रोजी देशभरातील ५५२ शहरांमध्ये आणि भारताबाहेरील १४ शहरांमधील ५ हजार ४६८ परीक्षा केंद्रांवर झाली. परीक्षेसाठी २२ लाख ७६ हजार ६९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी २२ लाख ९ हजार ३१८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असून १२ लाख ३६ हजार ५३१ विद्यार्थी पात्र ठरले. त्यापैकी ५ लाख १४ हजार ६३ मुले, ७ लाख २२ हजार ४६२ मुली आणि ६ तृतीयपंथी श्रेणीतील विद्यार्थी आहेत.

पात्र विद्यार्थ्यांमध्ये उत्तर प्रदेशची बाजी, महाराष्ट्र  दुसऱ्या स्थानी

एकूण पात्र विद्यार्थ्यांमध्ये उत्तरप्रदेशने देशात बाजी मारली. उत्तर प्रदेशातील १ लाख ७० हजार ६८४ पात्र ठरले. तर महाराष्ट्रातील १ लाख २५ हजार ७२७ विद्यार्थी पात्र ठरले. तिसऱ्या क्रमांकावर राजस्थान असून १ लाख १९ हजार ८६५ विद्यार्थी पात्र झाले.

प्रवर्गनिहाय पात्र विद्यार्थ्यांची संख्या

एकूण पात्र विद्यार्थ्यांपैकी ३ लाख ३८ हजार ७२८ सामान्य (जनरल), ९७ हजार ८५ ईडब्ल्यूएस, ५ लाख ६४ हजार ६११ ओबीसी, १ लाख ६८ हजार ८७३ एससी आणि ६७ हजार २३४ एसटी प्रवर्गातील आहेत.

गुण आणि कट-ऑफ घसरला

नीट परीक्षेचा यंदाचा पेपर कठीण आल्याच्या चर्चा होत्या. त्यामुळे अपेक्षेप्रमाणे यंदा विद्यार्थ्यांना कमी गुण मिळाले असून कट-ऑफ देखील घसरला आहे. दरवर्षी ७२० पैकी ७०० पेक्षा अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या असते. मात्र, यंदा एकाही विद्यार्थ्याला ७०० पेक्षा अधिक गुण मिळाले नाहीत. तसेच मागच्या दोन वर्षांच्या तुलनेत कट-ऑफ घसरला आहे.

७३ विद्यार्थ्यांना ६५० पेक्षा अधिक गुण

एकूण ७२० पैकी ७३ विद्यार्थ्यांनी ६५१ ते ६८६ दरम्यान गुण मिळवले आहेत. तर १ हजार २५९ विद्यार्थ्यांनी ६०१ ते ६५० दरम्यान गुण मिळवले आहेत. १० हजार ६५८ विद्यार्थ्यांना ५५१ ते ६०० दरम्यान गुण मिळाले आहेत.  

देशातील टॉप-१० विद्यार्थ्यांची यादी

1.     महेश कुमार - राजस्थान

2.     उत्कर्ष अवधिया- मध्य प्रदेश

3.     कृष्णांग जोशी - महाराष्ट्र

4.     मृणाल किशोर- दिल्ली

5.     अविका अग्रवाल - दिल्ली

6.     जेनिल विनोदभाई भयानी- गुजरात

7.     केशव मित्तल- पंजाब

8.     झा भव्य चिराग- गुजरात

9.     हर्ष केदावत- दिल्ली

10.  आरव अग्रवाल – महाराष्ट्र

टॉप- ५ मुली

1.     अविका अग्रवाल- दिल्ली

2.     आशी सिंह- दिल्ली

3.     बढे सिद्धी- महाराष्ट्र

4.     तनिषा- राजस्थान

5.     ऊर्जा राजेश शाह- महाराष्ट्र

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news