

Ashish Banerjee
बीरभूम : पश्चिम बंगालचे माजी उपसभापती आणि तृणमूल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बीरभूम जिल्ह्यातील रामपूरहाटचे पाच वेळा आमदार राहिलेले आणि ममता बॅनर्जी सरकारमधील माजी मंत्री असलेल्या आशिष बॅनर्जी यांचा मृतदेह रविवारी सकाळी त्यांच्या निवासस्थानाजवळील पक्ष कार्यालयात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला.
२००१ पासून रामपूरहाटचे प्रतिनिधित्व करणाऱ्या ७५ वर्षीय बॅनर्जी यांचा अलीकडील विधानसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार ध्रुव साहा यांच्याकडून पराभव झाला होता. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेतला असून, पुढील तपासासाठी तो शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रामपूरहाट येथील त्यांच्या निवासाजवळच असलेल्या टीएमसी कार्यालयात बॅनर्जी यांचा मृतदेह आढळला.
पोलिसांना मृतदेहाजवळ एका पानाची चिठ्ठी सापडली असून, त्यामध्ये बॅनर्जी यांनी लिहिले आहे की, त्यांच्या मृत्यूसाठी कोणीही जबाबदार नाही. मात्र, राजकारणात प्रवेश करणे ही आपल्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक होती, अशी जाणीव त्यांनी व्यक्त केली. मुळात शिक्षक असलेल्या बॅनर्जी यांनी चिठ्ठीत आपल्या निष्कलंक कारकिर्दीचा उल्लेख केला. त्यांनी नमूद केले की, आयुष्यभर त्यांनी कधीही चुकीच्या मार्गाने एक पैसाही स्वीकारला नाही आणि नेहमीच विद्यार्थ्यांना विनामूल्य शिक्षण दिले.
तारापीठ रामपूरहाट विकास प्राधिकरणात आपल्याला बाजूला सारले गेल्याच्या आणि आपली प्रतिमा मलीन करण्याच्या कारस्थानांचा उल्लेख करत त्यांनी लिहिले की, आपण कधीही कोणत्याही भ्रष्टाचारात सहभागी नव्हतो, तरीही आपल्याला अपमानास्पद वागणूक मिळाली. आपली व्यथा आणि निराशा व्यक्त करताना, त्यांनी आपल्या कुटुंबातील भावी पिढ्यांना राजकारणात कधीही न उतरण्याचा सल्ला दिला आहे.
आशिष बॅनर्जी हे तृणमूल काँग्रेसमधील एक अत्यंत वजनदार आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या निकटवर्तीयांपैकी एक मानले जात होते. रामपूरहाट विधानसभा मतदारसंघातून त्यांनी २००१, २००६, २०११, २०१६ आणि २०२१ अशा सलग पाच वेळा विजय मिळवला होता. ममता बॅनर्जी पहिल्यांदा सत्तेत आल्यापासून त्यांनी राज्याचे शिक्षण आणि कृषी मंत्री म्हणूनही जबाबदारी सांभाळली होती.