

पुढारी ऑनलाईन डेस्क : कर्मचारी भविष्य निधी संघटनेने (EPFO) काही महत्त्वाचे बदल केले आहेत, ज्यामुळे सदस्यांसाठी क्लेम सेटलमेंट, म्हणजेच प्रोविडेंट फंडमधून पैसे काढण्याची प्रक्रिया अधिक सोपी झाली आहे. केंद्र सरकारने ही माहिती संसदेत दिली.
सरकारने सांगितले आहे की, कर्मचारी भविष्य निधी (EPF)चे क्लेम सेटलमेंट सुलभ करण्यासाठी ऑटो-मोड प्रोसेसिंग आणि डेटा सेंट्रलायझेशन यांसारख्या अनेक तांत्रिक सुधारणा करण्यात आल्या आहेत. या बदलांमुळे EPF क्लेम सेटलमेंटची प्रक्रिया वेगवान तर होणार आहेच त्याचबरोबर सदस्यांना कार्यालयात जाऊन कागदपत्रे जमा करण्याच्या त्रासातूनही मुक्ती मिळेल.
श्रम आणि रोजगार राज्यमंत्री शोभा करंडलजे यांनी गुरुवारी (27 मार्च) राज्यसभेत लेखी उत्तर सादर केले. त्यात म्हटलंकी, EPFO ने ॲडव्हान्स क्लेमच्या ऑटो-मोड प्रोसेसिंगची मर्यादा 1 लाख रुपयांपर्यंत वाढवली आहे. पूर्वी ही सुविधा केवळ आजारपण आणि रुग्णालयात भरतीसाठी उपलब्ध होती. मात्र, आता ती हाउसिंग, शिक्षण आणि विवाह यांसारख्या इतर महत्त्वाच्या गरजांसाठीही लागू करण्यात आली आहे.
सरकारच्या मते, आता 60 टक्क्यांपेक्षा जास्त ॲडव्हान्स क्लेमवर ऑटो-मोड पद्धतीने प्रक्रिया केली जात असून फक्त 3 दिवसांत निकाली काढले जात आहेत. आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये आतापर्यंत 2.16 कोटी क्लेम ऑटो-मोडमध्ये निकाली काढण्यात आले आहेत.
आता ईपीएफओ सदस्य त्यांच्या आधार-सत्यापित यूएएन (युनिव्हर्सल अकाउंट नंबर) द्वारे त्यांचे आयडी स्वतः दुरुस्त करू शकतात. सरकारच्या माहितीनुसार, सध्या सुमारे 96 टक्के दुरुस्त्या ईपीएफओ कार्यालयाच्या हस्तक्षेपाशिवाय पूर्ण होत आहेत. यामुळे लाखो सदस्यांना कागदपत्रांची वारंवार पडताळणी करण्याच्या त्रासातून मुक्तता मिळाली आहे.
जर EPF सदस्याचा UAN आधारशी व्हेरीफाइड असेल, तर आता PF ट्रान्सफर किंवा पैसे काढण्यासाठी (EPF Withdrawal) नियोक्त्याच्या पडताळणीची गरज नाही. सरकारच्या माहितीनुसार, आता फक्त 10 टक्के प्रकरणांमध्येच सदस्य आणि नियोक्त्याच्या स्वाक्षरीची आवश्यकता असते, ज्यामुळे संपूर्ण प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि जलद झाली आहे.
केवायसी-अनुपालन करणारे यूएएन धारकांना आता क्लेम फॉर्मसोबत चेक-लीफ सादर करण्याची गरज नाही. सरकारच्या मते, या बदलामुळे क्लेम प्रोसेसिंगमधील गुंतागुंत कमी होईल आणि सदस्य अधिक सोप्या पद्धतीने त्यांचे PFचे पैसे काढू शकतील.
सरकारने सांगितले की, EPFO ने एक नवीन अपफ्रंट वेरिफिकेशन सिस्टम विकसित केली आहे, ज्यामुळे सदस्य आपल्या क्लेमच्या पात्रतेची (Eligibility) पूर्वकल्पना घेऊ शकतील. यामुळे चुकीचे किंवा अपात्र क्लेम टाळता येतील, तसेच सदस्यांचा वेळ वाया जाणार नाही.
ईपीएफओ त्यांच्या सदस्य डेटाबेसचे सीआयटीईएस 2.01 (CITES 2.01) प्रणाली अंतर्गत केंद्रीकरण करत आहे. ज्यामुळे क्लेम सेटलमेंटला गती मिळेल आणि तांत्रिक अडचणी दूर होतील. याशिवाय, EPFO 3.0 अंतर्गत सर्व स्टेकहोल्डर्ससोबत चर्चा सुरू आहे, जेणेकरून भविष्यात संघटनेला सदस्यांच्या हितासाठी अधिक डिजिटल आणि लाभदायक बनवता येईल.
सरकारने सांगितले की, EPFOच्या डेटा सुरक्षेसाठी नवीन सॉफ्टवेअर अपग्रेड, नेक्स्ट-जेनरेशन फायरवॉल, सुरक्षा ऑडिट, सायबर जागरूकता प्रशिक्षण आणि सुरक्षा धोरणे लागू करत असल्याचे सांगितले. यामुळे सदस्यांच्या संवेदनशील माहितीचे सायबर फसवणुकीपासून संरक्षण होईल.
एकूणच, ईपीएफओने आपल्या सदस्यांना चांगल्या सेवा आणि सुविधा देण्यासाठी अनेक मोठे बदल केले आहेत. या सुधारणांमुळे कोट्यवधी पीएफ सदस्यांना फायदा होईल आणि पैसे काढण्याची प्रक्रिया पूर्वीपेक्षा सोपी होईल.