

Maharashtra heat risk state : फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस तापणाऱ्या उन्हाने यंदाचा उन्हाळा तीव्र असल्याचे संकेत दिले होते. मार्च अखेरपर्यंतच राज्यातील अनेक भागांमध्ये उन्ह्याची तीव्रता जाणवू लागली. यंदा उष्णतेमध्ये झालेली वाढ ही चिंताजनक असल्याचे ऊर्जा, पर्यावरण आणि पाणी परिषदेने (CEEW) मंगळवारी ( दि. २०) प्रकाशित केलेल्या अभ्यासातील आकडेवारीवरुन स्पष्ट झाले आहे. या अभ्यासानुसार देशात उष्णतेने होरपळणार्या १० राज्यांत महाराष्ट्राचा समावेश झाला आहे.
'सीईईडब्ल्यू'ने देशातील जिल्हा-स्तरीय तापमान वाढीवरील केलेल्या मूल्यांकन केले. १९८२ ते २०२२ या कालावधीत हवामान बदलाचा भारतावर कसा परिणाम झाला, याचा अभ्यास करण्यात आला. अध्ययनात रात्रीचे तापमान आणि सापेक्ष आर्द्रता पातळी एकत्रित करताना भारतातील जवळजवळ ७३४ जिल्ह्यांचे उष्णतेच्या धोक्याचे मूल्यांकन ३५ निर्देशकांचा वापर करून केले गेले.
रिपोर्टनुसार, यंदा सुमारे ५७ टक्के भारतीय जिल्हे अति उष्णतेच्या झळा सहन करत आहेत. विशेष म्हणजे उष्ण दिवसांच्या तुलनेत अति उष्ण रात्रींमध्ये झालेली वाढ हा चिंतेचा विषय आहे. गेल्या दशकात मुंबईत अतिरिक्त १५ जास्त 'अत्यंत उष्ण रात्री' अनुभवल्या गेल्या आहेत. गेल्या दहा वर्षांत मार्च ते जून या कालावधीत उन्हाळ्याच्या महिन्यांत जवळजवळ ७० टक्के जिल्ह्यांमध्ये पाच अतिरिक्त 'अत्यंत उष्ण' रात्री अनुभवल्या गेल्या, जरी फक्त २८ टक्के जिल्ह्यांमध्ये अतिरिक्त 'अत्यंत उष्ण दिवस' अनुभवले गेले.
'सीईईडब्ल्यू'ने मूल्यांकन केलेल्या एकूण जिल्ह्यांपैकी, अभ्यासात असे आढळून आले आहे की किमान ४१७ जिल्ह्यांचे तापमानात वाढ झाली आहे. याची टक्केवारी ५७ इतकी आहे. उच्च ते अतिउष्णतेच्या धोक्यात असणार्या जिल्ह्यांमध्ये देशाच्या एकूण लोकसंख्येच्या सुमारे ७६ टक्के लोक राहतात. महाराष्ट्र, गोवा, केरळ, दिल्ली, गुजरात, राजस्थान, तामिळनाडू, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश या राज्यांना उष्णतेचा सर्वाधिक धोका आहे.
गेल्या तीन दशकांच्या तुलनेत मुंबईतील रहिवाशांना गेल्या दशकात प्रत्येक उन्हाळ्यात १५ अधिक 'अत्यंत उष्ण रात्री' अनुभवल्या आहेत. मुंबईनंतर बेंगळुरूचा क्रमांक लागतो येथे या वर्षी ११ रात्री तापमान वाढले. जयपूर, दिल्ली आणि चेन्नईचा क्रमांक लागतो जिथे अनुक्रमे सात, सहा आणि चार रात्रीचे तापमानात मोठ्या वाढीची नोंद झाली आहे.
दिवसा तीव्र उष्णतेच्या झळा सोसल्यानंतर रात्री तापमानात घट ही आरोग्यासाठी अनुकूल ठरते. मात्र रात्री तापमानात झालेली वाढ उष्माघातासारखे आरोग्य धोके तसेच मधुमेह आणि उच्च रक्तदाब यांसारखे आजार वाढतात. मुले, महिला, वृद्धांसाठी याचे अधिक गंभीर परिणाम होतात.
देशभरातील वाढत्या तापमान वाढीवर सीईईडब्ल्यूच्या सीईओ डॉ. अरुनाभा घोष यांनी सांगितले की, “आपल्याला स्थानिक गरजा ओळखून शहर पातळीवर उष्णतेशी संबंधित कृती आराखडे (HAP) तातडीने सुधारण्याची गरज आहे. तात्काळ प्रतिसाद आणि दीर्घकालीन उपाययोजना यांचा समतोल राखणे आणि शाश्वत थंडावा उपायांसाठी आर्थिक तरतूद करणे आवश्यक आहे.”