

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : देशातील अनेक राज्यांत मुसळधार पाऊस सुरूच आहे. उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये सलग तिसऱ्या दिवशी झालेल्या पावसामुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले. यामुळे प्रापंचिक साहित्याचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी सर्व शाळा बंद आहेत. रामबाग रेल्वेस्थानकाचे तीन ट्रॅकही पाण्यात बुडाले आहेत.
बिहारमधील बगहा येथे गंडक नदीच्या पाण्यामुळे तीव्र धूप होऊन प्राथमिक शाळेच्या ५ पैकी ४ खोल्या नदीत वाहून गेल्या. आता शाळेचा उरलेला भागही धूप होण्याच्या मार्गावर आहे. हिमाचल प्रदेशातील सिरमौर येथे मंगळवारी मुसळधार पावसात दरड कोसळून ३ जणांचा मृत्यू झाला. यामध्ये ट्रकचालक आणि नेपाळमधील दोन मजुरांचा समावेश आहे. पावसामुळे ८८ रस्ते बंद आहेत. मंडीमध्ये सर्वाधिक ३२, कुल्लूमध्ये २५ आणि सिरमौरमध्ये १० रस्ते बंद आहेत.
दुसरीकडे, उत्तराखंडमधील पौडी गढवाल येथे दरड कोसळून ३ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात पाऊस आणि दरडी कोसळल्यामुळे १२४ रस्ते बंद आहेत. पिथौरागढमध्ये कुलागाड व्हॅली ब्रिजवर मोठे दगड कोसळले. त्यामुळे हा पूल काली नदीत कोसळला. परिणामी, कैलाश-मानसरोवर मार्गावरील वाहतूक बंद झाली आहे.