

पुढारी ऑनलाईन डेस्क : जम्मू-काश्मीरच्या श्रीनगरमधील खानयार भागात दहशतवाद्यांशी आज (दि.२) चकमक सुरू आहे. यामध्ये भारतीय लष्कराचे ४ जवानांसह पोलीस कर्मचारीही जखमी झाल्याचे वृत्त आहे.
श्रीनगरच्या खानयार भागात झालेल्या चकमकीविषयी ANI शी बोलताना काश्मीरचे आयजीपी व्ही.के. बिर्डी म्हणाले, "...आता ऑपरेशन पूर्ण झाले आहे. सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याचा खात्मा केला आहे, ज्याची ओळख पटली आहे. तो उस्मान नावाचा एलईटी कमांडर असून, तो परदेशी दहशतवादी आहे. या चकमकीत सुरक्षा दलाचे चार सुरक्षा कर्मचारी जखमी झाले आहेत. इन्स्पेक्टर मसरूर यांच्या हत्येचा प्रकारही उघडकीस आला असून या संदर्भात अधिक तपास सुरू असल्याची माहिती त्यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
अधिकाऱ्यांनी सांगितले की, दहशतवादी लपून बसले असल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी शनिवारी (दि.१२) सकाळी खानयार परिसराची घेराबंदी केली आणि शोध मोहीम सुरू केली. त्यांनी पुढे सांगितले की, यावेळी दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार केला. त्यानंतर सुरक्षा दलांनीही त्याला चोख प्रत्युत्तर दिले.
या चकमकीदरम्यान सीआरपीएफचे दोन जवान आणि दोन पोलिस जखमी झाले आहेत, त्यांना लष्कराच्या 92 बेस हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. या भागात अजूनही कारवाई सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
जम्मू-काश्मीरच्या अनंतनागमध्येही चकमक झाली. या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले. सुरक्षा दलांनी या भागात दहशतवादविरोधी कारवाई सुरु केली होती. या दरम्यान सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांत चकमक झाली. श्रीनगरच्या खानयार भागातही अशाच प्रकारची चकमक सुरु आहे. या घटनेच्या काही तासांनंतर अनंतनागमध्ये चकमक सुरु झाली.