

Elvish Yadav
गुरुग्राम: वादग्रस्त युट्यूबर आणि बिग बॉस विजेता एल्विश यादवच्या गुरुग्राम येथील घराबाहेर आज पहाटे अज्ञातांनी अंदाधुंद गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, पोलीस हल्लेखोरांचा शोध घेत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना आज पहाटे साडेपाच ते सहा वाजण्याच्या सुमारास घडली. दुचाकीवरून आलेल्या तीन हल्लेखोरांनी सेक्टर ५७ मधील एल्विश यादवच्या घरावर अंदाजे २४ हुन अधिक गोळ्या झाडल्या आणि घटनास्थळावरून पसार झाले. या गोळीबारात घराच्या तळमजल्याला आणि पहिल्या मजल्याला गोळ्या लागल्याच्या खुणा स्पष्ट दिसत आहेत. घटनेच्या वेळी एल्विश यादव घरी नव्हता. तो घराच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावर राहतो. मात्र, गोळीबार झाला तेव्हा त्याचे काही कुटुंबीय घरातच होते. सुदैवाने या हल्ल्यात कोणीही जखमी झालेले नाही.
घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली आहे. यादव कुटुंबाकडून तक्रार दाखल झाल्यानंतर कायदेशीर कारवाई सुरू करून पुढील तपास केला जाईल, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. एल्विशच्या नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार, त्याला या घटनेपूर्वी कोणत्याही प्रकारची धमकी मिळाली नव्हती. एल्विश यादव सध्या हरियाणाच्या बाहेर असल्याचे समजते. या हल्ल्यामागे नेमका कोणाचा हात आहे आणि हल्ल्याचा हेतू काय होता, याचा पोलीस शोध घेत आहेत.