

Eknath Shinde Meet PM Modi: राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिल्लीत जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. नुकतेच सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्ष चिन्हाबाबत सुनावणी झाली. त्यावेळी सर्वोच्च न्यायालयाने काही टिप्पणी केली आहे. ठाकरे गटाची बाजू मांडणाऱ्या कपिल सिब्बल यांनी जोरदार युक्तीवाद केला.
सर्वोच्च न्यायालय आता निर्णायक स्थितीत पोहचलं असून या प्रकरणी ते निकाल देणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. त्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घेतलेली भेट चर्चेत आली.
एकनाथ शिंदे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीबाबत माहिती बाहेर आली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकनाथ शिंदेंच्या वडिलांच्या आरोग्याची विचारपूस केली. तसेच शिंदेंचा नातू रूद्रांशचीही आठवण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढली होती. मोदींनी नातू रूद्रांश कसा आहे अशी विचारणा केल्याचे समजते.
या भेटीनंतर एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना राज्याच्या विकासाच्या कामांबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा झाली असं प्रशासकीय उत्तर दिलं. दरम्यान, या भेटीनंतर एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या पक्षाच्या खासदारांची देखील बैठक घेतली. खासदार श्रीकांत शिंदे यांच्या निवासस्थानी ही बैठक पार पडली. यापूर्वी नरेंद्र मोदी यांनी देखील महाराष्ट्रातील खासदारांची भेट घेतली होती.