

बामणोली : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांचे मूळ गाव असलेल्या दरे तर्फ तांब, ता. महाबळेश्वर येथे तीन दिवसांच्या मुक्कामी दौऱ्यावर आले आहेत. या दौऱ्यात ते शेतीची कामे, स्थानिक विकासकामांचा आढावा आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत बैठका घेणार आहेत.
उपमुख्यमंत्री शिंदे यांनी कोल्हापूर येथे जाऊन दिवंगत डॉ. डी. वाय. पाटील यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेत कुटुंबीयांचे सांत्वन केले. त्यानंतर पावसाळी वातावरणामुळे त्यांनी रस्तेमार्गे सातारा, कास पठार आणि बामणोली असा प्रवास केला. बामणोलीहून बोटीने ते दरे येथे पोहोचले.
सातारा येथील बोगदा परिसरात शिवसेनेच्या पदाधिकारी व शिवसैनिकांनी त्यांचे स्वागत केले. दरे येथे पोहोचल्यानंतर त्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेतल्या आणि त्यानंतर विश्रांती घेतली. या तीन दिवसांच्या मुक्कामात शिंदे शेतीची कामे पाहणार असून, परिसरातील विविध विकासकामांचा आढावा घेण्यासाठी प्रशासकीय अधिकाऱ्यांसमवेत बैठका घेणार आहेत. पंधरा दिवसांपूर्वी ना. शिंदे हे दरेत आले होते. त्यानंतर पुन्हा गावी आल्याने त्यांच्या या दौऱ्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे.