Earth Day 2026 : पुढील २० वर्षांत पृथ्वीचे तापमान किती वाढेल, त्यामुळे मानवी जीवनात कोणत्या समस्या निर्माण होऊ शकतात?

वाढत्या उष्णतेने धोक्याची घंटा; जाणून घ्या काय सांगतोय जागतिक अहवाल
Earth Day 2026 : पुढील २० वर्षांत पृथ्वीचे तापमान किती वाढेल, त्यामुळे मानवी जीवनात कोणत्या समस्या निर्माण होऊ शकतात?
Published on
Updated on

नवी दिल्ली : "यावर्षी कमालीची उष्णता जाणवत आहे..." उन्हाळा सुरू झाला की आबालवृद्धांच्या मुखातून हेच वाक्य सर्रास ऐकायला मिळते. वाढत्या तापमानामुळे लहान मुले, वृद्ध आणि मुके प्राणीही व्याकुळ होत असून, प्रशासनाला वारंवार बचाव कार्यासाठी गाइडलाइन जारी कराव्या लागत आहेत. हवामान विभागही सातत्याने अलर्ट जारी करत आहे. ही दाहकता केवळ भारतापुरती मर्यादित नसून, संपूर्ण जगभरात दरवर्षी उष्णतेचे नवनवीन रेकॉर्ड नोंदवले जात आहेत. आज 'पृथ्वी दिवस' (Earth Day) निमित्ताने या गंभीर विषयावर मंथन करणे काळाची गरज बनली आहे.

तापमान वाढीचे मुख्य कारण: ग्रीनहाउस गॅस

पृथ्वीच्या सरासरी तापमानात होणाऱ्या या वाढीमागे अनेक कारणे असली तरी, 'ग्रीनहाउस गॅस'चे (Greenhouse gases) उत्सर्जन हे सर्वात प्रमुख कारण मानले जात आहे. शास्त्रज्ञांनी असा इशारा दिला आहे की, जर उत्सर्जनाचा हा वेग असाच कायम राहिला, तर येत्या २० वर्षांत पृथ्वीच्या सरासरी तापमानात वेगाने वाढ होऊन मानवी जीवनावर त्याचे अत्यंत गंभीर परिणाम होतील.

२०४६ पर्यंत किती वाढेल तापमान?

हवामानावर जागतिक अभ्यास करणाऱ्या 'Intergovernmental Panel on Climate Change' (IPCC) च्या अहवालानुसार, औद्योगिक क्रांतीपूर्वीच्या काळाच्या तुलनेत पृथ्वीचे तापमान आधीच १.२ ते १.३ अंश सेल्सिअसने वाढले आहे. सध्याचा कल पाहता, २०४५ ते २०५० या कालावधीत जागतिक तापमानात आणखी सुमारे ०.३ ते ०.६ अंश सेल्सिअसने भर पडू शकते. म्हणजेच, पुढील २० वर्षांत पृथ्वीचे तापमान १.५ अंश सेल्सिअसच्या त्या धोकादायक मर्यादेपर्यंत पोहोचेल, ज्याला शास्त्रज्ञ हवामान बदलाचा 'धोकादायक टप्पा' मानतात.

'World Meteorological Organization' (WMO) च्या आकडेवारीनुसार, पृथ्वीचे सध्याचे सरासरी तापमान १४ ते १५ अंश सेल्सिअसच्या दरम्यान आहे, जे २०४६ पर्यंत १५.५ ते १५.८ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचण्याची भीती आहे.

मानवी जीवनावर होणारे परिणाम

तज्ज्ञांच्या मते, या तापमान वाढीमुळे भीषण उष्णता आणि 'लू' (Heatwave) चालण्याचे प्रमाण वाढेल. याचा सर्वाधिक फटका लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि कष्टाची कामे करणाऱ्या मजूर वर्गाला बसून त्यांच्या आरोग्याचे प्रश्न गंभीर होतील. अनेक भागांत भीषण दुष्काळ आणि पाणीटंचाई निर्माण होईल, ज्यामुळे शेती आणि पिण्याच्या पाण्याचा पुरवठा विस्कळीत होऊ शकतो.

समुद्र पातळीत वाढ आणि अन्नाचे संकट

पुढील दोन दशकांत समुद्राची पातळी १० ते २० सेंटीमीटरने वाढू शकते. परिणामी, किनारपट्टीवरील शहरांना पूर आणि जमिनीची धूप होण्याचा धोका निर्माण होईल. वाढत्या उष्णतेचा थेट परिणाम पिकांच्या उत्पादकतेवर होऊन अन्नसुरक्षा धोक्यात येईल आणि महागाईत मोठी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

आरोग्याची समस्या: हीट स्ट्रोक आणि संसर्गजन्य आजार

वैद्यकीय तज्ज्ञांनी सावध केले आहे की, वाढत्या तापमानामुळे 'हीट स्ट्रोक', श्वसनाचे विकार आणि संसर्गजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढेल. डास आणि इतर कीटकांच्या उत्पत्तीसाठी पोषक वातावरण निर्माण झाल्यामुळे डेंग्यू आणि मलेरियासारख्या आजारांचा विस्तार वेगाने होऊ शकतो.

उपाययोजनांची गरज

तापमानाची ही वाढ रोखण्यासाठी तज्ज्ञांनी ठोस उपाय सुचवले आहेत. कार्बन उत्सर्जन कमी करणे, नवीकरणीय ऊर्जा (Renewable energy) स्रोतांना प्रोत्साहन देणे आणि हरित क्षेत्राचा (Green cover) विस्तार करणे अत्यंत आवश्यक आहे. 'पृथ्वी दिवस' (Earth Day) निमित्ताने केवळ चर्चा न करता, पर्यावरण संरक्षणासाठी सरकार आणि सामान्य जनता या दोघांनीही तातडीने पावले उचलणे ही काळाची गरज आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news