

नवी दिल्ली : मद्यपान करून वाहन चालवल्याचे दिसून आले तर संबंधिताचे ड्रायव्हिंग लायसन रद्द केले जाईल, अशी घोषणा केंद्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केली. ते गुरुवारी आयसीआयसीयद्वारा आयोजित रस्ते सुरक्षितता कार्यक्रमात बोलत होते. देशातील अपघातांच्या वाढत्या संख्येवर चिंता व्यक्त करून गडकरी म्हणाले, एखादी व्यक्ती मद्यपान करून गाडी चालवत असल्याचे वारंवार दिसून आले तर संबंधित चालकाचे ड्रायव्हिंग लायसन कायमस्वरूपी रद्द केले जाईल.
देशात दरवर्षी पाच लाखांहून अधिक रस्ते अपघात होतात आणि त्यात सरासरी 1 लाख, 80 हजार जणांचा अंत होतो. दखलपात्र बाब म्हणजे मृतांमध्ये 18 ते 45 वयोगटातील लोकांची संख्या 72 टक्के आहे. तसेच या अपघातांत 18 वर्षांखालील सुमारे दहा हजार जणांचा मृत्यू होतो. सीटबेल्ट आणि हेल्मेटचा वापर न केल्यामुळे वार्षिक सुमारे 68 हजार जणांना जीव गमवावा लागतो. अतिवेग, वाहन चालवत असताना मोबाईलवर बोलणे हीदेखील अपघातांमागील मुख्य कारणे आहेत. हे रोखण्यासाठी प्रामुख्याने युवक आणि किशोरवयीन मुलांवर विशेष लक्ष ठेवण्याच्या गरजेवर गडकरी यांनी भर दिला.