DRDO missile test | डीआरडीओच्या ‘यूएलपीजीएम-व्ही 3’ क्षेपणास्त्राची अंतिम चाचणी यशस्वी!

भारताची संरक्षण क्षेत्रात मोठी झेप : जमिनीवर आणि हवेत शत्रूला टिपण्याची क्षमता
DRDO missile test |
DRDO missile test | डीआरडीओच्या ‘यूएलपीजीएम-व्ही 3’ क्षेपणास्त्राची अंतिम चाचणी यशस्वी!
Published on
Updated on

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (डीआरडीओ) मंगळवारी अनमॅन्ड एरिअल व्हेईकल लाँच्ड प्रिसिजन गाईडेड मिसाईल (यूएलपीजीएम-व्ही 3) या प्रगत क्षेपणास्त्राची अंतिम विकास चाचणी यशस्वीरीत्या पूर्ण केली आहे. आंध्र प्रदेशातील कर्नूल येथील चाचणी केंद्रावर ही महत्त्वपूर्ण मोहीम पार पडली. भारताच्या संरक्षण सज्जतेमध्ये त्याद्वारे आणखी एक सुवर्णपान जोडले गेले आहे.

संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, या क्षेपणास्त्राची चाचणी एअर-टू-ग्राऊंड (हवेतून जमिनीवर) आणि एअर-टू-एअर (हवेतून हवेत) अशा दोन्ही प्रकारांमध्ये यशस्वी ठरली. ड्रोन आणि लढाऊ हेलिकॉप्टरच्या माध्यमातून शत्रूची ठिकाणे अचूक उद्ध्वस्त करण्यासाठी या क्षेपणास्त्राची रचना करण्यात आली आहे. या चाचणीसाठी एकात्मिक ग्राऊंड कंट्रोल सिस्टीमचा वापर करण्यात आला, जी अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे.

आत्मनिर्भर भारत मोहिमेला बळ

हैदराबादच्या रिसर्च सेंटर इम्रत या प्रयोगशाळेने डीआरडीओच्या इतर शाखांच्या सहकार्याने हे क्षेपणास्त्र विकसित केले आहे. यामध्ये पुणे, चंदीगड येथील प्रयोगशाळांचाही समावेश आहे. या क्षेपणास्त्राच्या निर्मितीमध्ये भारताच्या एमएसएमई आणि खासगी उद्योगांनी मोठे योगदान दिले असून, भारत डायनॅमिक्स आणि अदानी डिफेन्स सिस्टीम्स हे याचे उत्पादन भागीदार आहेत. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी या यशाबद्दल कौतुक केले असून, याला आत्मनिर्भरतेच्या दिशेने एक धोरणात्मक मैलाचा दगड म्हटले आहे.

* अचूक वेध घेण्याची क्षमता : यूएलपीजीएम-व्ही 3 हे संपूर्ण स्वदेशी, फायर-अँड-फॉरगेट तंत्रज्ञानावर आधारित क्षेपणास्त्र असून, ते ड्रोनद्वारे शत्रूच्या फिरत्या आणि स्थिर लक्ष्यांना नष्ट करू शकते.

* द्विआयामी मारा : हे क्षेपणास्त्र हवेतून जमिनीवरील रणगाडे आणि हवेतील शत्रूचे ड्रोन किंवा हेलिकॉप्टर दोन्हीवर अचूक हल्ला करण्यास सक्षम आहे.

* भारतीय उद्योगांचे यश : या क्षेपणास्त्राची निर्मिती पूर्णपणे भारतीय संरक्षण परिसंस्थेतील एमएसएमई आणि अग्रगण्य उत्पादन संस्थांच्या भागीदारीतून झाली आहे.

* द्रुत उत्पादनासाठी सज्ज : या यशस्वी चाचणीमुळे हे तंत्रज्ञान आता पूर्णपणे विकसित झाले असून, याचे मोठ्या प्रमाणावर तातडीने उत्पादन करणे शक्य झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news