

पुढारी ऑनलाईन डेस्क: भारताने संरक्षण तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात मोठी झेप घेतली आहे. DRDO (Defence Research and Development Organisation) ने विकसित केलेल्या लेझर डिरेक्टेड एनर्जी वेपन (DEW) MK-II(A) या स्वदेशी शस्त्रप्रणालीने कुरनूल येथे यशस्वी चाचणी पूर्ण करत, ड्रोनच्या झुंडीवर अचूक हल्ला केला.
हे भारताचं पहिलं 'स्टार वॉर्स' शैलीतील लेझर शस्त्र असून, यामुळे भारत आता अमेरिकासह काही मोजक्या महाशक्तींच्या पंक्तीत सामील झाला आहे.
ड्रोन युद्धाचा वाढता धोका आणि त्यावरील परवडणाऱ्या प्रत्युत्तराच्या दिशेने टाकलेलं हे एक ऐतिहासिक पाऊल मानलं जात आहे. DRDO ने 'X' (पूर्वीचं ट्विटर) वरील पोस्टद्वारे ही माहिती दिली आहे.
ही प्रणाली भारतीय सैन्यासाठी एक "गेम चेंजर" ठरणार आहे कारण आधुनिक युद्धांमध्ये ड्रोनचा वापर सर्रास केला जातो. अलीकडच्या काळात रशिया-युक्रेन युद्धात ड्रोनद्वार युद्ध दिसून आले आहे.
DRDO ने विकसित केलेली Laser Directed Energy Weapon (DEW) MK-II(A) ही वाहनावर बसवलेली लेझर प्रणाली आहे. जी उच्च-शक्तीच्या प्रकाशकिरणांनी (लेझर) लक्ष्य़ नष्ट करून टाकते. ही प्रणाली फिक्स्ड विंग UAV (ड्रोन) आणि ड्रोनच्या झुंडींना काही सेकंदांत निष्क्रिय करण्यात सक्षम आहे.
हैदराबाद येथील CHESS (Centre for High Energy Systems and Sciences) या DRDO च्या प्रयोगशाळेने ही प्रणाली LRDE, IRDE, DLRL, शैक्षणिक संस्था आणि भारतीय कंपन्यांच्या सहकार्याने तयार केली आहे.
कुरनूल (आंध्र प्रदेश) येथे वाहनावरून प्रणालीचे प्रात्यक्षिक यशस्वी झाले
स्थिर पंखांच्या ड्रोनला नेमकं लक्ष्य करत अचूक हल्ला
ड्रोनची झुंड नष्ट करत त्यांचे सेन्सर्स व अँटेना निष्क्रिय केला
प्रकाशाच्या वेगाने हल्ला. काही सेकंदांत लक्ष्यभेद
यंत्रणेची अचूकता, गती आणि परिणामकारकता अत्यंत प्रभावी
स्वदेशी Mk-II(A) DEW प्रणालीने दीर्घ अंतरावरील ड्रोन लक्ष्यांवर वार करून, ड्रोन्सचा हल्ला परतवून लावून आणि शत्रूच्या सेन्सर्स व अँटेना नष्ट करून तिच्या संपूर्ण क्षमतेचे प्रात्यक्षिक दिले.
लक्ष्यावर वीजेसारखा वेग, अचूकता आणि काही सेकंदांत होणारी हानी या प्रणालीला सर्वात प्रभावी अँटी-ड्रोन शस्त्र बनवते. ही प्रणाली रडार किंवा अंतर्भूत इलेक्ट्रो-ऑप्टिक (EO) प्रणालीद्वारे लक्ष्य ओळखून, प्रकाशाच्या वेगाने लक्ष्यांवर वार करते आणि शक्तिशाली लेझर बीमद्वारे लक्ष्य भेदून टाकते.
DRDO चे अध्यक्ष समीर व्ही. कामत यांनी ANI शी बोलताना सांगितले की, "अमेरिका, रशिया, चीन आणि इस्रायल या देशांनी यापूर्वी ही क्षमता विकसित केली आहे. भारताकडेही आता हे तंत्रज्ञान आहे. भारतदेखील आता या शक्तींशाली देशांपैकी एक आहे.
ही फक्त सुरुवात आहे. आम्ही उच्च ऊर्जा मायक्रोवेव्ह, इलेक्ट्रोमॅग्नेटिक पल्स अशा तंत्रज्ञानावरही काम करत आहोत. हे ‘स्टार वॉर्स’ क्षमतेच्या दिशेने एक पाऊल आहे."
ड्रोन युद्धाचं वाढतं प्रमाण: युक्रेन युद्धासारख्या संघर्षांमध्ये ड्रोनचा मोठ्या प्रमाणावर वापर होत आहे.
स्वस्त आणि अचूक शस्त्र पर्याय: पारंपरिक क्षेपणास्त्रांपेक्षा ही प्रणाली अधिक स्वस्त व वेगवान आहे.
नागरी हानीचा धोका कमी: केवळ लक्ष्यावर प्रभाव – कोलॅटरल डॅमेज कमी.
ड्रोन झुंडीविरोधात प्रभावी उपाय: एकाच वेळी अनेक ड्रोनला निष्क्रिय करणं शक्य.
अशा अत्याधुनिक शस्त्रांमुळे पारंपरिक शस्त्रांवरील अवलंबन कमी होऊन युद्ध क्षेत्रात क्रांती होऊ शकते. त्याचबरोबर खर्चिक दारुगोळ्याचा वापर कमी होतो आणि नागरी हानीही टाळता येते.
DEW ही पारंपरिक क्षेपणास्त्र प्रणालींची जागा घेऊ शकते कारण ही प्रणाली वापरणं सोपं आहे आणि खर्चही कमी आहे. कमी खर्चिक ड्रोन हल्ल्यांना उत्तर देण्यासाठी परवडणारी संरक्षण उपाययोजना ही जगभरातील सैन्य संस्थांची गरज बनली आहे.