

पुढारी ऑनलाईन डेस्क: फेसबुकवरून कवट्या, हाडं आणि मानवी अवशेष विक्रीसाठी ठेवल्याप्रकरणी अमेरिकेतील फ्लोरिडा राज्यातील 52 वर्षीय महिला किम्बर्ली स्कॉपर हिला अटक करण्यात आली आहे.
Wicked Wonderland या नावाने ती एक ऑनलाईन दुकान चालवत होती आणि त्यातून ती खरे मानवी अवशेष विकत होती, अशी माहिती स्थानिक पोलिसांनी दिली आहे.
किम्बरली स्कॉपर हिच्यावर फेसबुक आणि तिच्या दुकानाच्या माध्यमातून खऱ्या मानवी हाडांचा व्यापार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ती तिच्या ‘Wicked Wonderland’ नावाच्या व्यवसायातून मानवी कवट्या, हाडे विकत होती.
ऑरेंज सिटी पोलिसांनी सांगितले की, स्कॉपर फेसबुक मार्केटप्लेस आणि तिच्या दुकानातून मानवी अवशेष विकत होती. 21 डिसेंबर 2023 रोजी पोलिसांना माहिती मिळाली की एका स्थानिक व्यावसायिकाने फेसबुक मार्केटप्लेसवर मानवी अवशेष विक्रीसाठी ठेवले आहेत.
तक्रारदाराने पुरावा म्हणून स्क्रीनशॉटही दिले. यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला आणि स्कॉपरच्या दुकानात खालील गोष्टी विक्रीस असल्याचे आढळले:
दोन कवटींचे तुकडे – $90
एक मानवी खांद्याचं हाड – $90
एक मानवी बरगडी – $35
एक मानवी मणका – $35
अर्धवट कवटी – $600
हे सर्व अवशेष ताब्यात घेऊन वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले.
स्कॉपरने पोलिसांकडे कबुली दिली की ती खरेच मानवी अवशेष विकत होती. हे शैक्षणिक उद्देशाने विकले जात होते आणि फ्लोरिडामध्ये ते कायदेशीर असल्याचे तिला वाटले.
मात्र, फ्लोरिडा राज्यात मानवी ऊतकांचा व्यापार अत्यंत नियंत्रित आणि विशिष्ट परवानगीशिवाय बेकायदेशीर आहे. दरम्यान, तिने अनेक हाडे खाजगी विक्रेत्यांकडून खरेदी केल्याचा दावा केला, पण त्याचे कोणतेही लेखी पुरावे ती सादर करू शकलेली नाही.
पुरातन अवशेष?
वैद्यकीय अहवालानुसार, काही अवशेष 500 वर्षांहून जुने असून त्यांचे Archaeological महत्त्व असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
किम्बरली स्कॉपरला अटक केल्यानंतर 7500 डॉलरच्या जामिनावर दुसऱ्याच दिवशी तिला मुक्त करण्यात आले. मात्र, प्रकरणाचा तपास सुरू असून तिला अधिकृत गुन्ह्यांना सामोरे जावे लागणार आहे. ऑरेंज सिटी पोलीस विभाग आणि फेडरल तपास यंत्रणा मिळून या अवशेषांचे मूळ शोधत आहेत.
दरम्यान, सोशल मीडियावर विकल्या जाणाऱ्या अशा वस्तूंविषयी नेहमी सतर्क राहण्याची गरज तसेच याबाबतची कायद्याची चौकट माहिती असणे याची गरज या उदाहरणातून अधोरेखित झाली आहे.