नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा-
केंद्र सरकारने क्षयरोगाने त्रस्त असलेल्या रुग्णांना मिळणाऱ्या पोषण सहाय्याची रक्कम दुप्पट केली आहे. आता रुग्णांना पौष्टिक आहारासाठी वार्षिक १२ हजार रुपये मिळणार आहेत. पूर्वी त्यांना वर्षाला ६ हजार रुपये मिळत होते. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जे. पी. नड्डा यांनी ‘एक्स’वर पोस्ट करुन ही माहिती दिली.
केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा म्हणाले की, भारत क्षयरोग मुक्त करण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध आहे. या रोगाच्या उपचारात पोषण महत्वाची भूमिका बजावते. या पार्श्वभूमीवर टीबीच्या रुग्णांना या आजाराशी लढण्यासाठी बळ देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने 'निक्षय पोषण योजने' अंतर्गत सर्व क्षयरुग्णांसाठी उपचार कालावधी दरम्यान मासिक पोषण समर्थन सध्याच्या ५०० रुपयांवरून १००० रुपये प्रति महिना केले असल्याचे नड्डा म्हणाले. निक्षय पोषण योजनेंतर्गत, आतापर्यंत १.१३ कोटी लाभार्थ्यांना थेट लाभ हस्तांतरणाद्वारे ३ हजार २०२ कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत.
निक्षय पोषण योजना ही क्षयरुग्णांना सहाय्य करणाऱ्या चार योजनांपैकी एक आहे. ही योजना क्षयरुग्णांना त्यांच्या पोषणासाठी आर्थिक सहाय्य प्रदान करते. या योजनेअंतर्गत क्षयरोगावर उपचार घेणाऱ्या रुग्णांना उपचार पूर्ण होईपर्यंत आर्थिक प्रोत्साहन दिले जाते.