

ठळक मुद्दे
रशियाकडून कच्चे तेल खरेदी सुरूच ठेवल्याने ट्रम्प नाराज
अमेरिकेची ‘इंडो पॅसिफिक’ आघाडीची संकल्पना धोक्यात
चीनला रोखण्यात भारताची बदलती भूमिका अमेरिकेसाठी चिंताजनक
trump phone call four times to narendra modi but indian pm did not answer
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेले तब्बल चार फोन कॉल्स उचलले नसल्याचा खळबळजनक दावा एका प्रतिष्ठित जर्मन वृत्तपत्राने केला आहे. भारत-अमेरिका यांच्यातील व्यापार आणि टॅरिफ (आयात शुल्क) वादाच्या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध झालेल्या या वृत्तामुळे आंतरराष्ट्रीय राजकारणात मोठी चर्चा सुरू झाली आहे.
फ्रँकफर्टर अल्गेमाइन झायटुंग (एफ. ए. झेड.) या वृत्तपत्राने आपल्या अहवालात म्हटले आहे की, तक्रारी, धमक्या आणि दबाव टाकण्याची ट्रम्प यांची नेहमीची रणनीती भारतासमोर अपयशी ठरत आहे. अर्थात या दाव्याला अद्याप कोणत्याही अधिकृत सूत्रांकडून दुजोरा मिळालेला नाही.
‘एफएझेड’च्या हवाल्याने मीडिया वेबसाइट ‘वियॉन’ने दिलेल्या वृत्तानुसार, गेल्या काही आठवड्यांत ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदींना चार वेळा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र मोदींनी त्यांच्या फोनला उत्तर देण्यास नकार दिला. हा संपर्क नेमका कोणत्या तारखांना साधण्याचा प्रयत्न झाला, याचा उल्लेख मात्र अहवालात नाही. या वृत्तावर भारतीय अधिकार्यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
या अहवालानुसार, अमेरिकेच्या कृषी आणि दुग्ध व्यवसायासाठी भारतीय बाजारपेठ खुली करण्याच्या ट्रम्प यांच्या दबावाला पंतप्रधान मोदी तीव्र विरोध करत आहेत. याशिवाय युक्रेन युद्धानंतरही भारताने रशियाकडून तेल खरेदी सुरूच ठेवली आहे. भारताच्या या भूमिकेमुळे पुतीन यांच्या युद्ध यंत्रणेला आर्थिक बळ मिळत असल्याचा आरोप ट्रम्प यांनी केला होता. याच मुद्द्यांवरून दोन्ही नेत्यांमध्ये मतभेद असल्याचे म्हटले जात आहे.
हीच परिस्थिती कायम राहिली तर भारताला अमेरिकेत निर्यात होणार्या मालावर 50 टक्के टॅरिफचा सामना करावा लागू शकतो, अशी भीती व्यक्त होत आहे. यामध्ये 25 टक्के टॅरिफ व्यापारातील असंतुलनामुळे आणि अतिरिक्त 25 टक्के टॅरिफ रशियासोबतच्या तेल व्यापारामुळे लावला जाऊ शकतो. मला नाही वाटत की, ट्रम्प भारताला आणखी मुदतवाढ देतील, असे ट्रम्प यांचे सल्लागार पीटर नवारो यांनी म्हटल्याचेही अहवालात नमूद आहे.
पंतप्रधान मोदींना कोणत्याही ‘मीडिया स्टंट’मध्ये वापरले जाणे पसंत नाही, असेही या अहवालात म्हटले आहे. व्हिएतनामसोबतच्या एका घटनेचा दाखला देत ट्रम्प यांनी कोणताही ठोस करार होण्याआधीच सोशल मीडियावरून व्यापार कराराची घोषणा केली होती. अशा प्रकारच्या प्रसिद्धीच्या डावपेचांपासून मोदी दूर राहत असल्याचे दिसते. विश्लेषक मार्क फ्रेझियर यांच्या मते, अमेरिकेची ‘इंडो पॅसिफिक’ आघाडीची संकल्पना धोक्यात येत असून चीनला रोखण्यासाठी भारताची मध्यवर्ती भूमिका पाहता ही एक चिंताजनक बाब आहे.