

Rabies Death
राणीपेट: तामिळनाडूमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका १८ वर्षीय तरुणाचा रेबीजमुळे मृत्यू झाला असून, त्याला दोन वर्षांपूर्वी कुत्रा चावला होता. दोन वर्षांनंतर अचानक त्याची प्रकृती खालावली आणि त्याच्यामध्ये रेबीजची लक्षणे दिसून आली. दिवा असे या तरुणाचे नाव असून चेन्नईच्या राजीव गांधी सरकारी रुग्णालयात उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
राणीपेट जिल्ह्यातील मोसुर गावातील जे. दिवा हा बारावी उत्तीर्ण झाला होता. त्याचे आई-वडील रोजंदारीवर काम करतात. दिवा याला भटक्या कुत्र्यांची प्रचंड ओढ होती, तो अनेकदा त्यांच्यासोबत खेळायचा. सुमारे दोन वर्षांपूर्वी त्याला एका भटक्या कुत्र्याने चावा घेतला होता. मात्र, त्यावेळी त्याने ही बाब गांभीर्याने घेतली नाही आणि घरीही सांगितलं नाही. त्यामुळे त्याचे लसीकरण झाले नव्हते. गेल्या शनिवारी त्याला अचानक तीव्र ताप आला. त्याला तातडीने अरक्कोनम येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
प्रकृती अधिकच बिघडल्याने त्याला चेन्नईच्या राजीव गांधी सरकारी रुग्णालयात हलवण्यात आले. तपासणीनंतर डॉक्टरांना त्याच्यात रेबीजची लक्षणे आढळली. त्याला आयसीयूमध्ये हलवून तज्ज्ञांच्या देखरेखीखाली उपचार सुरू करण्यात आले, मात्र दोन दिवसांतच त्याची प्रकृती वेगाने खालावली आणि उपचारादरम्यानच त्याचा मृत्यू झाला.
तज्ज्ञांच्या मते, रेबीज विषाणूचा संक्रमण झाल्यापासून लक्षणे दिसेपर्यंतचा काळ हा कुत्रा शरीराच्या कोणत्या भागावर चावला आहे आणि विषाणूचे प्रमाण किती आहे, यावर अवलंबून असतो. हा काळ काही दिवसांपासून ते काही वर्षांपर्यंत असू शकतो. विषाणूचा प्रभाव सुरू होण्यास १० दिवसांपासून ते काही वर्षांचा काळ लागू शकतो. या प्रकरणात शास्त्रीयदृष्ट्या दोन शक्यता असू शकतात, एकतर मुलाला अलीकडेच पुन्हा एखादा कुत्रा चावला असेल, किंवा जुन्या जखमेतील विषाणू पुन्हा एखाद्या दुखापतीमुळे सक्रिय झाला असेल.
अधिकाऱ्यांनी सांगितले की, तपासणीदरम्यान मुलगा अत्यंत गोंधळलेल्या अवस्थेत होता. सुमारे दोन वर्षांपूर्वी त्याला एक भटका कुत्रा चावल्याची माहिती मिळाल्यावर, डॉक्टरांना रेबीजशी संबंधित मेंदूज्वराचा संशय आला. त्याला चेन्नईच्या राजीव गांधी रुग्णालयात हलवण्यात आल्यानंतर तिथे रेबीज झाल्याचे स्पष्ट झाले.
आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले की, जे. दिवा याला भटक्या कुत्र्यांसोबत खेळायला खूप आवडायचे. त्याला अनेकदा कुत्र्यांसोबत खेळताना पाहिले जात असे. कुत्रा कधी चावला होता, याची माहिती त्याच्या पालकांनाही नव्हती. कदाचित त्याने या घटनेची कोणाला माहिती दिली नसावी किंवा ती गांभीर्याने घेतली नसावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. योग्य वेळी लसीकरण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण रेबीजची लक्षणे चावल्यानंतर काही वर्षांनीही दिसू शकतात.