

dog fought cobra drove it away from house and sacrificed its life for its owner
पुढारी ऑनलाईन : उत्तर प्रदेशातील बलिया येथे एका कुत्र्याने आपल्या मालकासाठी जीवाची पर्वा न करता कोब्रा सापाशी झुंज दिली. घरात शिरण्याचा प्रयत्न करणाऱ्या सापाला कुत्र्याने घराबाहेरच रोखून धरले. बराच वेळ दोघांमध्ये झुंज सुरू होती. या संघर्षात कुत्रा आणि साप दोघांचाही मृत्यू झाला. यावेळी नेमके काय झाले ते पाहुयात..
मालक आणि कुटुंबाच्या सुरक्षेसाठी कुत्र्याने दिली प्राणांची आहुती
बलिया येथे घडलेल्या या घटनेने माणूस आणि प्राणी यांच्यातील नात्याची प्रचिती दिली आहे. पाळीव प्राणी येणाऱ्या संकटाची चाहूल आधीच ओळखतात आणि आपल्या मालकाच्या तसेच कुटुंबाच्या सुरक्षेसाठी स्वतःचा जीव धोक्यात घालायलाही मागेपुढे पाहत नाहीत. अशीच निष्ठा दाखवणाऱ्या एका पाळीव कुत्र्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
रात्रीच्या वेळी एका घरात कोब्रा साप शिरण्याचा प्रयत्न करत होता. त्यावेळी घराच्या गेटवर पहारा देत असलेल्या पाळीव कुत्र्याची नजर सापावर पडली. कुटुंबातील सर्वजण घरात झोपलेले असताना कुत्र्याने सापाला घरात जाण्यापासून रोखण्यासाठी त्याच्यावर झडप घातली.
कोब्रा आणि कुत्र्यामध्ये बराच वेळ झुंज
ही घटना बेल्थरा रोड येथील उभांव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील असल्याची माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एका घरात कोब्रा साप शिरण्याचा प्रयत्न करत होता. घराचा पाळीव कुत्रा नेहमीप्रमाणे गेटवर बसून मालक आणि त्याच्या कुटुंबाची रखवाली करत होता. घरातील लोक निवांत झोपले होते. त्यांना घराबाहेर साप असल्याची कोणतीही कल्पना नव्हती.
मात्र कुत्र्याला सापाची चाहूल लागताच त्याने त्याला रोखण्यासाठी झेप घेतली. मालक आणि कुटुंबीयांचे प्राण वाचवण्यासाठी कुत्रा कोब्रासोबत भिडला. त्याने स्वतःच्या जीवाचीही पर्वा केली नाही.
सापाच्या दंशाने कुत्र्याचा मृत्यू
कुत्रा बराच वेळ कोब्राशी झुंजत राहिला आणि त्याने सापाला घरात प्रवेश करू दिला नाही. या दरम्यान कोब्राने कुत्र्याला अनेक वेळा दंश केला. मात्र शेवटच्या श्वासापर्यंत कुत्रा सापाशी लढत राहिला. अखेर कुत्र्याने कोब्राला ठार केले.
सापाच्या दंशामुळे कुत्र्याच्या शरीरात विष पसरले. सुमारे अर्ध्या तासानंतर त्याची प्रकृती बिघडू लागली. घरातील लोकांना बाहेर नेमके काय घडले आहे, याची कल्पनाच नव्हती. पाहता पाहता घराच्या अंगणातच त्या निष्ठावान कुत्र्याने अखेरचा श्वास घेतला.
व्यक्तीने केला संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद
घराच्या बाहेर साप दिसताच कुत्रा जोरजोरात भुंकू लागला. त्याचा आवाज ऐकून एक व्यक्ती घराबाहेर आली आणि संपूर्ण प्रकार पाहू लागली. मात्र त्याने ना घरातील मालकाला उठवण्याचा प्रयत्न केला, ना सापाला तेथून हटवण्याचे धाडस केले.
तो व्यक्ती गल्लीत उभा राहून कुत्रा आणि सापामधील झुंज पाहत राहिला आणि संपूर्ण घटना आपल्या मोबाईलमध्ये कैद केली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, कुत्र्याच्या निष्ठेचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.