

DK Shivakumar Cabinet: गेल्या बुधवारी म्हणजे ३ जून रोजी कर्नाटकात मुख्यमंत्र्याच्या शपथविधीसोबतच काही मंत्र्यांनी देखील शपथ घेतली. सिद्धरामय्या यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर काँग्रेसने डीके शिवकुमार यांच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ घातली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांचे सहकारी मंत्री म्हणून रामलिंगा रेड्डी यांनी देखील मंत्रीपदाची शपथ घेतली. मात्र या शपथविधीनंतर अवघ्या तीन दिवसात त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळं पश्चिम बंगाल प्रमाणे कर्नाटकात देखील आमदारांचे नाराजी आणि बंडखोरी नाट्य सुरू झाले आहे का अशी भीती व्यक्त केली जात आहे.
रेड्डी आपल्या पदाचा राजीनामा देताना म्हणाले, 'डीके शिवकुमार हे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेण्यापूर्वी माझ्या घरी आले होते. त्यांनी मला बंगळुरू पोर्टफोलियो देण्यात येईल असं सांगितलं होतं. मी त्यांच्याकडे कोणताही पोर्टफोलियो मागितला नव्हता. त्यांनी स्वतःहून मला हा पोर्टफोलियो ऑफर केला होता त्यावर मी ठीक आहे म्हणालो होतो.'
मुख्यमंत्र्यांनी दोनवेळा मला पोर्टफोलियो ऑफर केला होता. मात्र त्यांनी मला पाटबंधारे मंत्रालय दिलं. हे मला मान्य नाही. त्यामुळं मी माझ्या मंत्रीपदाचा राजीनामा देत आहे.'
रामलिंगा रेड्डी यांनी जरी त्यांच्या आवडीचे मंत्रीपद दिलं तरी ते डीके शिवकुमार यांच्या नेतृत्वाखाली ते मंत्रीपद स्विकारणार नाही असं देखील सांगितलं आहे.
रामलिंगा रेड्डी म्हणाले, 'जरी आता त्यांनी मला बेंगलोर पोर्टफोलिओ दिला तरी मी तो स्विकारणार नाही. मी एक आमदार म्हणून काम करणार आहे. मी काँग्रेस सोबतच आहे.'
गुरूवारी रात्री मुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी १३ मंत्र्यांना पोर्टफोलिओ दिला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रेड्डी हे बंगळुरू पोर्टफोलिओसाठी अडून बसले होते. मात्र डीके शिवकुमार यांनी तो नाकारला. रेड्डी त्यानंतर त्या बैठकीतून बाहेर पडले. या बैठकीत रेड्डी यांनी मुख्यमंत्र्यांना २०२३ मध्ये त्यांनी बंगळुरू विकास पोर्टफोलियो देतो असे आश्वासन दिलं होतं याची आठवण करून दिली.