Diwali 2026 : सशस्त्र नक्षलवाद संपला, आता वैचारिक नक्षलवाद्यांशी मुकाबला; बस्तरमध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर निशाणा

दरवर्षीप्रमाणे यंदाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या रक्षणकर्त्यांसोबत दिवाळी साजरी केली.
Diwali 2026
Diwali 2026 : सशस्त्र नक्षलवाद संपला, आता वैचारिक नक्षलवाद्यांशी मुकाबला; बस्तरमध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर निशाणाfile photo
Published on: 
Updated on: 

Diwali 2026: Armed Naxalism has ended; now the battle is against ideological Naxalites—PM Modi takes aim at opponents in Bastar

पुढारी ऑनलाईन : दरवर्षीप्रमाणे यंदाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या रक्षणकर्त्यांसोबत दिवाळी साजरी केली. यावेळी पंतप्रधान मोदी छत्तीसगडमधील बस्तर येथे सीआरपीएफच्या जवानांसोबत दिवाळी साजरी करण्यासाठी पोहोचले. एकेकाळी नक्षलवाद्यांचा प्रभाव असलेल्या या भागात त्यांनी जवानांना संबोधित केले. यावेळी त्यांनी विरोधकांवरही निशाणा साधला. काही संघटनांवर वैचारिक नक्षलवाद्यांनी कब्जा केला असून, ते देशाच्या संविधान आणि लोकशाहीविरोधात लोकांना भडकवत असल्याचे मोदी म्हणाले.

Diwali 2026
CM फडणवीसांनी साजरी केली शेतकऱ्यांसोबत दिवाळी; PM मोदी म्हणाले, ‘मनाला भिडणारे पाऊल’

'ही पहिली दिवाळी आहे, जेव्हा देशातील प्रत्येक जिल्हा नक्षलवादमुक्त आहे'

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, "ही पहिली दिवाळी आहे, जेव्हा देशातील प्रत्येक जिल्हा नक्षलवादमुक्त झाला आहे आणि आपण जवानांसोबत दिवाळी साजरी करत आहोत." याचे संपूर्ण श्रेय जवानांच्या बलिदानाला आणि समर्पणाला जाते, असेही त्यांनी सांगितले. नक्षलवादाविरोधातील लढाईत सुरक्षादलांनी दिलेल्या बलिदानाचा सन्मान करण्यासाठी आपण त्यांच्यासोबत दिवाळी साजरी करत असल्याचे मोदी म्हणाले.

मोदी पुढे म्हणाले, "आमच्या सरकारने नक्षलवादी आणि फुटीरतावाद्यांच्या आर्थिक रसद पुरवठ्यावर मोठा प्रहार करणारे निर्णय घेतले. सरकारच्या निर्णयांमुळे बनावट नोटांचे जाळे उद्ध्वस्त झाले आणि नक्षलवादी तसेच फुटीरतावाद्यांची पुरवठा साखळी विस्कळीत झाली. गेल्या ४७ वर्षांत पहिल्यांदाच, मागील एका वर्षात कर्तव्य बजावताना सीआरपीएफच्या एकाही जवानाला प्राण गमवावे लागले नाहीत."

नक्षलवादाविरोधातील लढाई सोपी नव्हती, असेही पंतप्रधानांनी सांगितले. एकेकाळी देशातील जवळपास २० राज्यांमधील २३० हून अधिक जिल्हे नक्षलवादाच्या विळख्यात होते. संध्याकाळ झाली की जनजीवन ठप्प व्हायचे. लोकांना घराबाहेर पडणेही अशक्य व्हायचे. नागरिकांचा मतदानाचा अधिकारही नक्षलवाद्यांनी हिरावून घेतला होता. बिहार, महाराष्ट्र, ओडिशा, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडसह देशाचा मोठा भाग डाव्या विचारसरणीच्या उग्रवादाच्या प्रभावाखाली होता. हजारो गावे आणि कोट्यवधी लोकांना वर्षभरात दोन ते तीन हजार नक्षली हल्ल्यांचा सामना करावा लागत होता.

Diwali 2026
Sunny Deol Fitness : वयाच्या ६९ व्या वर्षीही सनी देओल फिट अन् तंदुरुस्त! फिटनेससाठी पाळतात ३ सोप्या सवयी

'नामदारांच्या डोळ्यांतून एक अश्रूही आला नाही'

पंतप्रधान मोदी म्हणाले की, २०१० मध्ये याच परिसरातील दंतेवाडा येथे नक्षलवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत सीआरपीएफचे ७६ जवान शहीद झाले होते. त्याच वर्षी दंतेवाडा येथे घडलेल्या आणखी एका घटनेत ४४ निष्पाप नागरिकांची हत्या करण्यात आली होती. "ही भूमी आपल्या वीरांच्या रक्ताने पावन झाली आहे. मात्र, महालांमध्ये राहणाऱ्या कोणत्याही नामदाराच्या तोंडून दुःखाचा हुंकारही ऐकू आला नाही. त्यांच्या डोळ्यांतून एक अश्रूही आला नाही," अशा शब्दांत मोदी यांनी विरोधकांवर टीका केली.

'गरीबी हटाओच्या घोषणांनी जे झाले नाही, ते १२ वर्षांत करून दाखवले'

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर निशाणा साधताना म्हटले की, अनेक दशकांपासून 'गरीबी हटाओ'च्या घोषणा दिल्या जात होत्या. मात्र, त्या घोषणांमधून जे साध्य झाले नाही, ते गेल्या १२ वर्षांत करून दाखवले. बस्तरमधील नागरिकांना माहीत आहे की, ज्या भागात नक्षलवाद्यांचा प्रभाव होता, तिथे त्यांचा पहिला अजेंडा विकास रोखणे हा असायचा. सामान्य नागरिकांच्या जीवनावर त्याचा परिणाम व्हायचा. मुलांसाठी शाळा सुरू करू दिल्या जात नव्हत्या, उलट शाळांना आग लावली जात होती, असेही मोदी म्हणाले.

'अनेक संघटनांवर वैचारिक नक्षलवाद्यांनी कब्जा केला'

जवानांना संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले, "नक्षली हिंसाचाराचा अंत झाला आहे. जंगलांमधील सशस्त्र नक्षलवादी संपले आहेत; मात्र वैचारिक नक्षलवाद्यांनी अनेक संघटनांवर कब्जा केला आहे. आजही ते देशाचे संविधान आणि लोकशाहीविरोधात लोकांना भडकवत आहेत. अनेक राजकीय पक्ष आणि संघटनांमध्ये वैचारिक नक्षलवाद्यांनी घुसखोरी केली आहे. आपल्याला त्यांना ओळखायचे आहे, त्यांचा पराभव करायचा आहे आणि देशाला सुरक्षित ठेवायचे आहे."

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.