

पुढारी ऑनलाईन डेस्क: INDIA Alliance | संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू होऊन आज (दि.५) ९ दिवस झाले. पहिले काही दिवस संसद सभागृहात मणिपूर, संभल हिंसाचार आणि अदानी मुद्द्यावरून संसदेत विरोधकांचा गदारोळ सुरूच आहे. अधिवेशनादरम्यान काँग्रेस केवळ अदानी मुद्द्यावर आक्रमक होत आहे. मात्र आज इतरही मुद्दे मांडण्यासाठी आहेत, असे म्हणत इंडिया आघाडीतील इतर पक्षांनी आज (दि.५) संसद परिसरातील निदर्शनाकडे पाठ फिरवली. यावरूनच सरकारला नेमकं कोणत्या मुद्द्यांवरून घेरायचे? यावर विरोधकांचे एकमत नसल्याचे स्पष्ट झाले असून, इंडिया आघाडीतील मतभेद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहेत.
संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या आज नवव्या दिवशी काँग्रेस खासदारांनी संसद भवन संकुलात अदानी मुद्द्यावर निदर्शने केली. "काँग्रेस खासदारांनी संसद सभागृहात अदानी मुद्यावर चर्चा व्हावी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या मुद्द्यावर बोलावे तसेच अदानी प्रकरणावर संसदीय समिती स्थापन करावी", अशा मागणी केली. दरम्यान, या निदर्शनाला तृणमूल, समाजवादी खासदारांनी अनुपस्थित राहत 'संसदेत मांडण्यासाठी इतर मुद्दे असल्याचे' म्हणत पुन्हा एकदा अदानी विरोध टाळला आहे.
तृणमूल काँग्रेस आणि समाजवादी पक्षाने पुन्हा काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांनी संसदेच्या संकुलात आयोजित केलेल्या गौतम अदानी लाचखोरी प्रकरणाच्या निषेधापासून दूर राहिल्यानंतर इंडिया आघाडीत फूट पडल्याची अटकळ अधिक गडद झाली. तृणमूलचे खासदार कीर्ती आझाद म्हणाले की, "पक्षाकडे इतरही मुद्दे अधोरेखित करण्यासाठी आहेत. परंतु संसद सभागृहात विरोधक त्यांच्या रणनीतीमध्ये एकत्रच असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. सभागृहात आमची इंडिया आघाडी म्हणून रणनीती एकच असेल, परंतु त्याचवेळी आमच्याकडे इतर भिन्न मुद्दे देखील आहेत जे हायलाइट करायचे आहेत."
संसदेच्या अधिवेशनात इंडिया आघाडीच्या गटनेत्यांची रोज बैठक होते. सोमवारी (दि.२) झालेल्या संसदेतील इंडिया आघाडीच्या बैठकीत तृणमूल काँग्रेसने अनुपस्थित राहणे पसंत केले. काँग्रेस केवळ अदानी मुद्द्यावर आक्रमक होते आणि त्यामुळे इतर मुद्द्यांकडे दुर्लक्ष होते, हा विचार तृणमूल काँग्रेस करत असल्याचे समजते. त्यामुळे बाहेरून इंडिया आघाडी एकत्र असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न करत असली तरीही आतून मात्र सुप्त संघर्ष सुरू असल्याचे यावरून समोर आले आहे.