Hollywood actress Diane Keaton passes away
लॉस एंजेलिस: ऑस्कर पुरस्कार विजेत्या हॉलीवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्री डायन किटन (Diane Keaton) यांचे वयाच्या ७९ व्या वर्षी निधन झाले. कॅलिफोर्निया येथे शनिवारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. किटन यांनी आपल्या पाच दशकांच्या कारकिर्दीत अनेक अविस्मरणीय भूमिका साकारल्या होत्या.
चित्रपटांमधील भूमिका असोत वा वैयक्तिक जीवन, डायन किटन त्यांच्या युनिक फॅशन स्टाईलसाठी ओळखल्या जात होत्या, ज्यात पुरुषांसारखे कपड्यांचा समावेश असे. लॉस एंजेलिसमध्ये जन्मलेल्या डायन किटन यांना १९७० च्या दशकात 'द गॉडफादर' चित्रपट मालिकेतील के अॅडम्स-कॉर्लिओन या भूमिकेमुळे जगभर ओळख मिळाली. यानंतर १९७८ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'अॅनी हॉल' या चित्रपटातील अभिनयासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा ऑस्कर पुरस्कार मिळाला होता. याच भूमिकेसाठी त्यांना गोल्डन ग्लोब आणि बाफ्टा पुरस्कारही मिळाला होता.
किटन यांनी 'अॅनी हॉल' व्यतिरिक्त 'फादर ऑफ द ब्राईड', 'फर्स्ट वाईव्ज क्लब', 'समथिंग्ज गॉटा गिव्ह' आणि 'रेड्स' यांसारख्या अनेक यशस्वी चित्रपटांमध्ये काम केले. वुडी अॅलन यांच्या अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्येही त्यांची मुख्य भूमिका होती. तसेच, 'समथिंग्ज गॉटा गिव्ह', 'मार्व्हिन्स रूम' आणि 'रेड्स' या चित्रपटांसाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीसाठी आणखी तीन ऑस्कर नामांकने मिळाली होती. अभिनयासोबतच त्यांनी 'हेवन', 'अनस्ट्रंग हिरोज' आणि 'हँगिंग अप' यांसारख्या काही चित्रपटांचे दिग्दर्शनही केले होते.